रायगडमध्ये युतीचाच बोलबाला 

मिरवणुकीत जल्‍लोष करताना युतीचे पदाधिकारी.
मिरवणुकीत जल्‍लोष करताना युतीचे पदाधिकारी.

 अलिबाग : रायगड जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचे अनपेक्षित निकाल लागले असून श्रीवर्धन वगळता अन्य सहा मतदारसंघात आघाडीच्या उमेदवारांचा फारसा प्रभाव दिसला नाही. पेण, अलिबाग आणि कर्जत हे मतदारसंघ युतीने आघाडीकडून हिसकावून घेतले. एकूण सात मतदारसंघांपैकी पाच मतदारसंघांत युतीच्याच उमेदवारांचा मोठ्या फरकाने बोलबाला राहिला. जिल्ह्यातील कर्जतचे विद्यमान आमदार सुरेश लाड, उरणचे मनोहर भोईर, पेणचे धैर्यशील पाटील आणि अलिबागचे सुभाष (पंडित) पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला. 

उरण मतदारसंघातील निवडणूक चुरशीची झाली असून या एकमेव मतदारसंघात महायुतीचे मनोहर भोईर यांचा पराभव झाला. या मतदारसंघात अपक्ष उमेदवार महेश बालदी 5 हजार 710 मतांनी विजयी झाले. शेकापचे अलिबागचे सुभाष (पंडित) पाटील, पेणमध्ये धैर्यशील पाटील, उरणमध्ये विवेक पाटील आणि पनवेलमध्ये हरेश केणी यांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवला आहे.

सर्वात अनपेक्षित निकाल अलिबाग मतदारसंघातील असून येथे शेकापचे उमेदवार सुभाष (पंडित) पाटील यांचा 32 हजार 981 मतांच्या फरकाने पराभव झाला. अलिबागमध्ये शेकापचा हा सत्तर वर्षातील सर्वात मोठ्या मताधिक्‍याने पराभव आहे. शिवसेनेचे महेंद्र दळवी यांनी एकहाती विजय मिळवत शेकापचे या मतदारसंघातून दहाव्यांदा विजय मिळवण्याचे स्वप्न धुळीला मिळवले. 

पेणमध्येही शेकापला मतदारांनी नाकारले असून येथे भाजपचे रवीशेठ पाटील 23 हजार 218 मतांच्या फरकाने विजयी झाले आहेत. कर्जत मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश लाड यांना शिवसेनेचे महेंद्र थोरवे यांनी 18 हजार 506 मते मिळवत पराभूत केले.

पनवेल मतदारसंघात भाजपचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांनी 92 हजार 370 एवढे मताधिक्‍य घेत विजयाची हॅट्ट्रिक पूर्ण केली आहे. महाड मतदारसंघात शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी 21 हजार 256 मतांनी दणदणीत विजय मिळवला. त्यांनी कॉंग्रेसचे उमेदवार माणिक जगताप यांचा सलग तिसऱ्यांदा पराभव केला. 


अलिबागकरांनी पाटलांना घरी बसवले 
रस्त्यातील खड्डे, दूषित पाणीपुरवठा, रोजगार, नापीक होणारी खारभूमी यांसारख्या समस्या सोडवण्यात अपयशी ठरलेल्या अलिबाग-रुड मतदारसंघाचे सुभाष (पंडित) पाटील यांना अलिबागच्या मतदारांनी घरी बसवले. या मतदारसंघातून 33 हजारांच्या फरकाने शेकापला लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला. या मतदारसंघात कॉंग्रेसच्या उमेदवाराला फारसा प्रभाव दाखवता आला नाही. 

कर्जतमध्ये सुरेश लाड यांना धक्का 
कर्जत मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सुरेश लाड यांना मतदारांनी नाकारले. युतीच्या कार्यकर्त्यांनी येथे प्रथमच एकजूट दाखविल्याने शिवसेनेचे महेंद्र थोरवे यांनी 18 हजार 506 मतांच्या फरकाने विजय मिळवला. तिकिटावरून या मतदारसंघात चांगलेच वादळ झाले होते. अखेर पक्षश्रेष्ठींनी केलेल्या समझोत्यानंतर युतीच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करत विजय खेचून आणला. 

महाडमध्ये भरत गोगावले यांची हॅट्ट्रिक 
महाड : महाड मतदारसंघात शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी 21 हजार 256 मतांनी दणदणीत विजय मिळवत विजयाची हॅट्ट्रिक पूर्ण केली आहे. गोगावले यांनी कॉंग्रेसचे उमेदवार माणिक जगताप यांचा सलग तिसऱ्यांदा पराभव केला. 

पेणमध्ये भाजपचे कमळ 
पेण- सुधागड- रोहा विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदाच भाजपचे कमळ फुलले आहे. या निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार रविशेठ पाटील यांनी शेकापचे विद्यमान आमदार धैर्यशील पाटील यांचा सुमारे 23 हजार 595 मतांनी पराभव केला. पाटील यांना एक लाख 11 हजार 309 मते मिळाली. आमदार धैर्यशील पाटील यांना 87 हजार 714 मते मिळाली. 

अदिती तटकरेंची दमदार एन्ट्री 
राज्याच्या राजकारणात प्रवेश करण्यासाठी राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे यांनी श्रीवर्धन या सुरक्षित मतदारसंघाची निवड केली होती; मात्र शिवसेनेचे विनोद घोसाळकर यांनी या निवडणुकीत उडी घेतल्याने ही निवडणूक खासदार सुनील तटकरे यांनी प्रतिष्ठेची केली. अखेर आदिती तटकरे यांनी 39 हजार 621 मतांच्या फरकाने विजय मिळवत राजकारणात दमदार प्रवेश केला आहे. 

उरणमध्ये युतीतील गृहयुद्ध 
शिवसेनेचे मनोहर भोईर यांच्याविरोधात बंडखोरी करत भाजपचे नेते महेश बालदी यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. यामध्ये भोईर यांना 5 हजार 710 एवढ्या कमी मतांच्या फरकाने बालदी यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. या मतदारसंघातील युतीच्या अंतर्गत कलहाचे पडसाद रायगड जिल्ह्यातील इतर मतदारसंघातही उमटले होते. युतीच्या गृहयुद्धाचा फायदा शेकापचे विवेक पाटील यांना होईल, असे विश्‍लेषण काही जणांनी मांडले होते; परंतु तसे काही घडले नाही. 

पनवेलमध्ये प्रशांत ठाकूर यांचा मोठा विजय 
पनवेल मतदारसंघात भाजपचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांनी 92 हजार 370 एवढे मताधिक्‍य घेत विजयाची हॅट्ट्रिक पूर्ण केली आहे. दुसऱ्या क्रमांकाचे शेकापचे उमेदवार हरेश केणी यांना 86 हजार 211 मते मिळाली. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर "नोटा'ला 12 हजार 371 मते मिळाली आहेत. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com