सफेद कांदा लागवड लांबणीवर 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

अलिबाग तालुक्‍यात कांद्याची लागवड सरासरी एक हजार एकर क्षेत्रामध्ये केली जाते. त्यात सध्या रोहा, माणगाव तालुक्‍यातही काही ठिकाणी कांद्याची लागवड करण्यास सुरुवात करण्यात आली आहे; मात्र रोहा व माणगाव तालुक्‍यातील कांद्यापेक्षा अलिबागचा कांदा मोठा व आणि चविष्ट तसेच खाण्यास रुचकर असल्याने या कांद्याला अधिक पसंती दिली जाते.

अलिबागः पावसामुळे जमिनीमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यात कापणीही लांबणीवर गेली आहे. त्यामुळे डिसेंबरमध्ये सुरू होणारी सफेद कांद्यांची लागवड जानेवारीमध्ये होण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. त्याचा परिणाम कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
 
सफेद कांदा हा औषधी म्हणून ओळखला जातो. विशेष म्हणजे अलिबागच्या म्हणजे कार्ले, खंडाळ्यामधील कांद्याला जिल्ह्यासह अन्य बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यात अलिबागच्या कांद्याची चव वेगळी असल्याने पर्यटकही अलिबागचे सफेद कांदे खरेदी करण्यास उत्सुक असतात. अलिबाग तालुक्‍यात कांद्याची लागवड सरासरी एक हजार एकर क्षेत्रामध्ये केली जाते. त्यात सध्या रोहा, माणगाव तालुक्‍यातही काही ठिकाणी कांद्याची लागवड करण्यास सुरुवात करण्यात आली आहे; मात्र रोहा व माणगाव तालुक्‍यातील कांद्यापेक्षा अलिबागचा कांदा मोठा व आणि चविष्ट तसेच खाण्यास रुचकर असल्याने या कांद्याला अधिक पसंती दिली जाते.

कापणीचा हंगाम संपल्यानंतर डिसेंबरला कांद्याची लागवड करण्यास सुरुवात केली जाते. फेब्रुवारीमध्ये हा कांदा बाजारात विक्रीसाठी दाखल होतो. 20 ते 25 लाखांची उलाढाल या कांद्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांकडून होते; परंतु परतीच्या पावसामुळे जिल्ह्यात कापणीची कामेही रखडली आहेत. पाऊस पडण्याच्या भीतीने शेतकऱ्यांनी कापणीची कामे थांबविली आहेत. शेतकऱ्यांचे आभाळाकडे डोळे लागले आहेत; मात्र रात्री-अपरात्री अचानक पाऊस बरसत असल्याने हातातोंडाशी आलेले भातपीक जाण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावू लागली आहे. सफेद कांद्यांची लागवड ही ओल्या दमट, दवाच्या पाण्यावर होते. फार कमी पाणी लागते; मात्र सध्या पावसामुळे शेतामध्ये चिखल व पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने कांद्यांची लागवड एक महिना उशिरा म्हणजे जानेवारीमध्ये होण्याची शक्‍यता आहे. त्याचा बाजारपेठेवर परिणाम होण्याची चिंता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

डिसेंबरमध्ये कांद्याची लागवड होते; परंतु या पावसामुळे कांद्याची लागवड जानेवारीमध्ये होण्याची शक्‍यता आहे. 
पांडुरंग शेळके, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी 

कांद्यांची लागवड थंडीच्या हंगामात चांगली होते; मात्र पावसामुळे ही लागवड लांबणीवर जाण्याची भीती आहे. त्याचा परिणाम कांद्याच्या उत्पादनावर होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे बाजारात कांद्याला पाहिजे तसा भाव मिळणार नाही. 
- शशिकांत थळे, शेतकरी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad issue