चुलींना मागणी
चुलींना मागणी

पावसामुळे कुंभार समाज अडचणीत

रोहाः परतीच्या पावसाचा मुक्काम वाढला असल्याने शेतकऱ्यांबरोबरच कुंभार समाजही अडचणीत आला आहे. दर वर्षी दिवाळीनंतर मातीच्या चुली बनवून विक्री करणारा कुंभार समाजाचा व्यवसाय पावसाचा मुक्काम वाढला असल्याने अडचणीत आला आहे. चुली ओल्या राहत असल्याने विकल्या गेल्या नाहीत. जिल्हाभरात कुंभार समाजाचे सुमारे चार कोटी रुपयांचे नुकसान होत असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
 
दसरा सरताच जिल्ह्याभरातील कुंभरवाडे चुली बनवण्याच्या कामात गढून जातात. जमिनीत केलेल्या खड्ड्यात दोन दिवस माती फुगवून ती बाहेर काढून सेट केली जाते. सेट झालेली माती साच्यात घालून चुली घडवल्या जातात. त्या चुली उन्हात चांगल्या सुकवल्या जातात. सुकलेल्या चुलींची विक्री केली जाते. यंदा दसरा सरला, दिवाळी सरली तरी परतीचा पाऊस मुक्काम ठोकून आहे. पाऊस नियमित पडत असल्याने चुकीसाठी माती फुगायला घालता येत नाही. फुगलेली माती सेट होत नाही. माती सेट होत नसल्याने त्यापासून चुलीही बनावता येत नाहीत. चुली बनवल्या तरी त्या सुकवता येत नाहीत. मागच्या वर्षी बनवून ठेवलेल्या चुली पाऊस सुरूच असल्याने विकल्या गेल्या नाहीत. या हंगामात जिल्ह्यात सुमारे एक ते दोन लाख चुलींची विक्री होते. चुलींची प्रतिनग सरासरी किंमत 200 रुपये असते. यामुळे जिल्हाभरात कुंभार समाजाचे सुमारे चार कोटी रुपयांचे नुकसान होत असल्याची माहिती रोहा, कुंभारवाडा येथील दिनेश धाटवकर यांनी दिली. 

मातीच्या चुलीचे प्रकार 
बामणी चूल- ही मधल्या तोंडाची चूल म्हणूनही ओळखली जाते. या चुलीला दोन्ही बाजूला वाईल (भांडे ठेवण्यासाठी केलेली मोठी जागा) असते. सरपण लावण्याची जागा मधोमध असल्याने दोन्ही बाजूला सारखीच झळ लागते. दोन्ही बाजूला जेवण शिजवता येते. या चुलींची घाऊक किंमत 200 ते 300 रुपये असते; तर किरकोळ किंमत 300 ते 400 रुपये असते. 
वाईल तोंडाची चूल- या चुलीला एका बाजूला वाईल व एका बाजूला बालम (भांडे ठेवण्याची छोटी जागा) असते. सरपण लावण्याची जागा वाईल बाजूला असल्याने जास्त आग वाईलवर ठेवलेल्या भांड्याला लागते व बालम वर ठेवलेले अन्न मंद आचेवर शिजत राहते. या चुलींची घाऊक किंमत 150 ते 250 असते; तर किरकोळ किंमत 250 ते 350 मिळते. या चुलीला सर्वाधिक मागणी आहे. 
चुला- ही एकच भांडे ठेवण्याची चूल असते. फार्म हाऊस वगैरे ठिकाणी ही चूल वापरली जाते. याची घाऊक किंमत 100 रुपये, तर किरकोळ किंमत 150 रुपयांपर्यंत असते. 
इंदे- चुलीवर भांडे वरच्यावर राहावे म्हणून मातीचे उंचवटे केले जातात त्याला इंदे म्हणतात. 

चुलींना मागणी कायम 
घरोघरी गॅसच्या चुली आल्या असल्या तरी मातीच्या चुलीवर शिजलेल्या अन्नाला वेगळीच चव असते. काही हॉटेलवाले चुलीवरचे जेवण मिळेल अशी जाहिरात करतात. त्यामुळे ग्रामीण भागात अजूनही मातीच्या चुलींची मागणी कायम आहे. 

परतीच्या पावसाचा मुक्काम वाढल्याने या वर्षी चुली बनवताही आल्या नाहीत आणि विकताही आल्या नाहीत. कुंभार समाजाचे मोठे नुकसान होत आहे. 
- रघुनाथ धाटवकर. चुली बनवणारे कुंभार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com