मोदी फार्महाऊसवर चोऱ्या

नीरव मोदी याचे अलिशान फार्महाऊस सध्या भकास बनले आहे.
नीरव मोदी याचे अलिशान फार्महाऊस सध्या भकास बनले आहे.

अलिबाग ः एकेकाळी हिरे मोत्यांचा झगमगाट असणारा किहीम समुद्रकिनाऱ्यावरील हिरा व्यापारी नीरव मोदी याचा अलिशान फार्महाऊस आता चोरट्यांच्या पथ्यावर पडला आहे. जिल्हा प्रशासनाने 8 मार्चला केलेल्या कारवाईत फार्महाऊसमधील मुख्य भाग डायनामाईडने उडवून देण्यात आला होता; तेव्हापासून हा फार्महाऊस बंद आहे. या फार्महाऊसकडे कुणीही फिरकत नसल्याने चोरट्यांचे चांगलेच फावले आहे. यातील काही महत्त्वाचे किमती सामान चोरीला गेले आहे. याबद्दल जिल्हा प्रशासन अनभिज्ञ आहे. 

"रुपण्या' या नावाने किहीम-कोलगाव समुद्रकिनारी असलेल्या नीरव मोदीच्या फार्महाऊसचा थाट आता पूर्णपणे लयाला गेला आहे. जागोजागी वाढलेली झुडपे, काचांचे तुकडे, कॉंक्रीटचा ढिगारा दिसत आहे. बंगला पाडत असताना बाहेर ठेवलेले किमती सामान आता गायब झाले आहे. बंगल्याचा मुख्य भाग डायनामाईडचा स्फोट घडवून पाडण्यात आला होता.

या स्फोटातील मलबा मोठ्या प्रमाणात बाजूला पडला आहे. डोळे दिपवणारे रोषणाईचे दिवे चोरीस गेले आहेत. सगळीकडे भकासपणा दिसत असल्याने या बाजूला गावकरीही फारसे फिरकत नाहीत. सगळीकडे गवत, झुडपे, पडलेला बांधकामाचा ढाचा यामुळे हा अलिशान फार्महाऊस आता भूतबंगल्यासारखा भकास दिसत आहे.

एकेकाळी या फार्महाऊसवर फिल्मजगत, उद्योग जगतातील बड्या हस्तींचा वावर असायचा. अंतर्गत सजावटीसाठी किमती वस्तू वापरलेल्या होत्या. कारवाई करण्यापूर्वी यातील काही वस्तूंचा ईडीच्या माध्यमातून लिलाव करण्यात आला. त्यानंतरही काही मौल्यवान वस्तू येथेच पडून होत्या. या वस्तू आता गायब झालेल्या आहेत.

पंजाब नॅशनल बॅंकेला तब्बल 13 हजार कोटींचा चुना लावून परदेशात पसार झालेला हिरा व्यापारी नीरव मोदी यांचा हा बंगला बेकायदा असल्याने त्यावर कारवाईचे आदेश न्यायालयाने जिल्हा प्रशासनाला दिले होते. 

श्रीमंतीचा थाट झाला नाहीसा! 
निरव मोदीच्या फार्महाऊसमध्ये गौतमबुद्धांची मौल्यवान मूर्ती होती, याचबरोबर पितळेचे झुंबरही होते. जर्मन बनावटीच्या खिडक्‍या, दुर्मीळ पेटिंग, अंतर्गत सजावटीचे किमती साहित्य आता गायब झालेले आहे. स्वीमिंग पूल, विविध फुलांनी सजलेला बगीचा, बगीच्यामध्ये ठेवलेल्या दुर्मीळ मूर्ती असा श्रीमंतीचा थाट येथे पाहावयास मिळत होता; मात्र हा थाट आता पूर्णपणे नाहीसा झाला आहे. 

8 मार्चला झालेल्या कारवाईनंतर जिल्हा प्रशासनाचे अधिकारी तेथे फिरकलेले नाहीत. स्फोटानंतर तेथे दगडच उरले आहेत. त्यामुळे तेथे राखणदार ठेवणे प्रशासनाला परवडण्यासारखे नव्हते आणि चोरांना कुणीही रोखू शकत नाही. फार्महाऊसमधील काही वस्तू चोरीला गेल्या आहेत, अशी तक्रार अद्याप दाखल झालेली नाही. 
शारदा पोवार, प्रांताधिकारी, अलिबाग 

हिरा व्यापारी नीरव मोदी याच्या बंगल्याच्या बाजूने समुद्राकडे जाणारा रस्ता आहे. परंतु मोदीच्या भकास बंगल्यामुळे या बाजूला दिवसादेखील फिरकण्यास भीती वाटते. रात्रीची परिस्थिती याहूनही गंभीर असते. 
सुकुमार पाटील, नागरिक, किहीम


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com