पेणला वाहतूक कोंडीचे ग्रहण 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

पेण : पेण शहरातील अरुंद रस्ते, फेरीवाल्यांचे अतिक्रमण, वाहनतळाचा अभाव आणि रस्त्यामध्ये होणाऱ्या बेकायदा पार्किंगमुळे वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. पेणमधील वाहतूक कोंडीमुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालणेही कठीण झाले आहे. त्यामुळे बेकायदा अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे. 

पेण : पेण शहरातील अरुंद रस्ते, फेरीवाल्यांचे अतिक्रमण, वाहनतळाचा अभाव आणि रस्त्यामध्ये होणाऱ्या बेकायदा पार्किंगमुळे वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. पेणमधील वाहतूक कोंडीमुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालणेही कठीण झाले आहे. त्यामुळे बेकायदा अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे. 

रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पेण तालुक्‍याची व शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पेण शहरात वाहनतळाची व्यवस्था नसल्याने शहरातून किंवा आजूबाजूच्या गावांतून खरेदीसाठी येणारे नागरिक आपले वाहन रस्त्यामध्येच पार्किंग करून ठेवतात. आधीच अरुंद रस्ते, त्यात रस्त्यांच्या दुतर्फा वाढलेली अतिक्रमणे आणि हातगाड्यांची वाढती संख्याही वाहतूक कोंडीस कारणीभूत आहे. पालिकेच्या गटारावरही अतिक्रमण झाल्याने रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या मार्गावरून पादचाऱ्यांना चालणेही कठीण झाले आहे. 

हातगाडीचालकांचे अतिक्रमण 
शहरातील चावडी नाका ते रायगड बाजार या मार्गाच्या दुतर्फा बऱ्याच ठिकाणी विविध हातगाड्या, छोटीमोठी दुकाने आणि गॅरेजवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. शहरातील मोरेश्वर टॉकीजसमोरील रस्त्यावरही हातगाडी चालकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे येथून चालताना पादचाऱ्यांना रस्ता शोधावा लागत आहे. शहरात असलेले विक्रम स्टॅंड व बसस्थानक या ठिकाणीदेखील वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. 
कोतवाल चौकात असणाऱ्या मॉलमध्ये खरेदीसाठी येणारे नागरिक रस्त्यामध्येच वाहन पार्क करत असल्याने या वळणाच्या ठिकाणावरदेखील वाहतूक कोंडी कायम असते. 

 वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रिंग रोडला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. निधीदेखील मंजूर झालेला आहे. लवकरच या कामास सुरुवात होईल. त्यामुळे पेण शहरातील वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होईल. 
- अर्चना दिवे, मुख्याधिकारी, पेण नगरपालिका 

पेण शहरात दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे दुचाकी चालवणेदेखील कठीण झाले आहे. पार्किंगची व्यवस्था नाही. भाजी विक्रेते, मच्छी विक्रेते, फळ, भाजीविक्रेत्यांवर बंधने आणण्याची आवश्‍यकता आहे. रस्तेरुंदीकरणसाठी नगरपालिकेने प्रयत्न करावेत. 
- रामकृष्ण पाटील, रहिवासी, पेण 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raigad Issue