शिधावाटप दुकानांत मिळणार शालेय साहित्य 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

अलिबाग : शिधावाटप दुकानदारांना खर्च भागवता यावा, यासाठी दुकानातून आता शालेय वस्तूविक्रीला अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने परवानगी दिली आहे. या योजनेतून रायगड जिल्ह्यातील 1 हजार 365 रास्त भाव दुकानदारांना लाभ मिळणार आहे. शिधावाटप दुकानदार, संस्थांना अन्य वस्तू विकता येत नव्हत्या, त्या विकण्याची मुभा पुरवठा विभागाने दिली आहे. 

शिधावाटप दुकानदारांना प्रत्येक क्विंटलमागे 150 रुपये एवढे कमिशन सरकारकडून दिले जाते. यातून खर्च भागवणे परवडत नसल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे. रास्त भाव दुकानदारांचे उत्पन्न वाढावे, यासाठी रास्त भाव दुकानातून सार्वजनिक व्यवस्थेंतर्गत वितरित होणाऱ्या वस्तू व खाद्यपदार्थांसह स्टेशनरी वस्तू विक्रीस मुभा देण्यात आली आहे. तसेच इतर खुल्या बाजारातील वस्तू, दुध व दुग्धजन्य पदार्थ, प्रमाणित बी-बियाणे, कोल्हापूर जिल्हा खादी ग्रामोद्योग संघ यांनी उत्पादित केलेल्या सर्व वस्तू विक्री करण्यास सरकारने परवानगी दिली आहे.

शिधावाटप दुकानांवरील धान्यवितरण व्यवस्था ऑनलाईन करत पुरवठा विभागाने कडक उपाययोजना आखल्या आहेत. त्यामुळे आर्थिक नुकसान होत असल्याच्या तक्रारी काही रास्त भाव दुकानदार संस्थांनी सरकारकडे केल्या होत्या. ज्या दुकानदारांकडे कमी ग्राहकसंख्या आहे, अशा दुकानदारांनी परवडत नसल्याकारणास्तव धान्य वितरण बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे दुकानदार संस्थांची आर्थिक कोंडी कमी करण्यासाठी उपाययोजना आखण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला आहे. 

रास्त भाव दुकानामध्ये विकण्यास परवानगी दिलेल्या वस्तूंच्या विक्रीचे सर्व अधिकार सबंधित दुकानदारांना दिलेले आहेत. यामध्ये सरकारचा कोणताही हस्तक्षेप असणार नाही. 
- मधुकर बोडके, जिल्हा पुरवठा अधिकारी, रायगड 

दुकानासाठी जागा भाड्याने घेणे, कामगारांचा पगार देणे हे खर्चिक झाले आहे. इतर वस्तू विकण्यास मुभा दिल्याने ग्रामीण भागातील दुकानदारांना थोडासा दिलासा मिळणार आहे. 
- जयराम पाटील, दुकानदार 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raigad Issue