कर्जतमध्ये सीएनजीवर खोळंबा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

कर्जत तालुक्‍यात वाढत्या नागरीकरणाबरोबरच येथील गाड्यांच्या संख्येतही लक्षणीय वाढ होत आहे. यामध्ये सीएनजीवर चालणाऱ्या गाड्यांची वाढ होत असताना कर्जतमध्ये फक्त एकच हालीवली गावाजवळ सीएनजी फिलिंग सेंटर आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून आणखी सीएनजी पंप व्हावा, अशी येथील नागरिकांची तसेच रिक्षाचालकांची मागणी आहे. त्यामुळे नेहमीच येथे सीएनजी भरण्यासाठी गाड्यांच्या रांगा पाहायला मिळत असतात.

कर्जतः तालुक्‍यातील एकमेव सीएनजी फिलिंग सेंटरवर वाहनचालकांना तासन्‌तास रांगा लावाव्या लागत आहेत. त्यामुळे त्यांना गैरसोईला सामोरे जावे लागत आहे. त्यातच सीएनजी फिलिंग करताना प्रवासी आणि वाहनचालकांना सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून गाडीतून उतरून बाजूला उभे राहावे लागते. या खोळंब्यामुळे प्रवासी व नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या पंपावर नागरिकांना कोणत्याही प्रकारची आसन व्यवस्था नाही. सध्या पर्यटन हंगाम असल्याने पर्यटकांची गर्दी वाढली आहे.
 
कर्जत तालुक्‍यात वाढत्या नागरीकरणाबरोबरच येथील गाड्यांच्या संख्येतही लक्षणीय वाढ होत आहे. यामध्ये सीएनजीवर चालणाऱ्या गाड्यांची वाढ होत असताना कर्जतमध्ये फक्त एकच हालीवली गावाजवळ सीएनजी फिलिंग सेंटर आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून आणखी सीएनजी पंप व्हावा, अशी येथील नागरिकांची तसेच रिक्षाचालकांची मागणी आहे. त्यामुळे नेहमीच येथे सीएनजी भरण्यासाठी गाड्यांच्या रांगा पाहायला मिळत असतात.

काहीच दिवसांपूर्वी अंबरनाथ येथील फॉरेस्ट नाका येथील सीएनजी फिलिंग सेंटरवर रिक्षामध्ये सीएनजी भरत असताना मोठा स्फोट होऊन दोन-तीन रिक्षांचे नुकसान झाले होते. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यामुळे महानगर गॅस आणि सर्व सीएनजी पंपावरील सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना वाढवल्या असून, सीएनजी भरताना गाडीतून प्रवाशांनी अगोदरच उतरावे, अशा सूचना देण्यात येत आहेत; परंतु कर्जतच्या पंपावर अगोदरच एवढी गर्दी असते. त्यामुळे लोकांना तासन्‌तास ऊन-पावसात उभे राहावे लागत असून, पंप व्यवस्थापन तसेच महानगर गॅस यांनी कोणत्याही प्रकारची आसन व्यवस्था केली नाही.

सीएनजी पंपच्या नियमावलीत आसन व्यवस्था करणे अभिप्राय असतानाही याकडे कानाडोळा करताना दिसत आहे. म्हणूनच या ठिकाणी आसन व्यवस्था करावी, अशी मागणी जोर घेत आहे. दरम्यान, याबाबत तेथील व्यवस्थापकांशी विचारणा केली असता त्यांनी आपण याप्रश्‍नी काहीही बोलणार नसल्याचे सांगितले. 

कर्जत तालुक्‍यात एकच सीएनजी पंप असल्याने नेहमीच येथे गर्दी होते. त्यामुळे आणखी एक अधिक सीएनजी पंप हवेत. सीएनजी भरताना लोकांना गाडीबाहेर उतरवले जाते. त्यामुळे लोकांना तासन्‌तास ऊन-पावसात बाहेर उभे राहावे लागते. यासाठी आसन व्यवस्था हवी. 
- नीलेश पाटील, वाहनचालक 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad issue