जिल्ह्यात भाज्या शंभरीपार 

भाज्यांची आवकच कमी
भाज्यांची आवकच कमी

वडखळ- अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला असताना आता भाज्यांचे भावही कडाडल्याने सर्वसामान्यांना जगणे अवघड झाले आहे. किरकोळ बाजारात दैनंदिन वापरातील जवळपास सर्वच भाज्यांनी शंभरी गाठली आहे.

दुसरीकडे मासेमारी बंद असून, आवक कमी झाल्याने मासळीचे भावही वाढले आहेत. 
राज्यभरात होत असलेल्या अवकाळी पावसाचा फटका भाजीपाला व पिकांना बसला आहे. सतत पडत असलेल्या पावसामुळे भाजीपाला कुजला आहे. उरलेल्या चांगल्या मालाचे भावही गगनाला भिडले आहेत. किरकोळ बाजारातील भावही चांगलेच वाढले आहेत. वाटाणा, गवार, भेंडी, कारले, दुधी, तोंडली, फ्लॉवर, कोबी, फरसबी, वांगी आदी भाज्या म्हणजे शाळकरी मुले आणि चाकरमान्यांचा डब्याचा मुख्य आधार आहे; मात्र काही दिवसांपासून या भाज्यांचे भाव वाढल्यामुळे सर्वसामान्य जनतेला त्याचा फटका सहन करावा लागत आहे.

दोडका, गवार, वांगी आदी भाज्यांसाठी प्रतिकिलो 80 ते 100 रुपये मोजावे लागत आहेत, तर कांद्याने शंभरी पार केली आहे. टोमॅटो 70 ते 80 रुपये, बटाटा 35 रुपये किलो, पालेभाजी एक जुडी 40 ते 50 रुपये, कोथिंबीर जुडी 80 ते 90 रुपये, किरकोळ विक्रेते 10 रुपयाला कोथिंबीर द्यायला नकार देतात. भाज्यांचे भाव असेच वाढले तर सर्वसामान्यांच्या खर्चात वाढ होणार आहे.

वादळामुळे समुद्रातील मासेमारी बंद असल्याने बाजारात मासळीची आवक कमी झाली आहे. परिणामी मासळीच्या भावात वाढ झाली आहे. खाडीतील व तलावातील मासळीला मागणी वाढली आहे. फटूस 250 रुपये प्रतिकिलो, कटला 300 रुपये किलो, जिताडा 600 रुपये किलोने विकला जात आहे, तर चिंबोरी 40 ते 50 रुपये प्रतिनग भावाने विकली जात असल्याने मासळी खाणेही परवडेनासे झाले आहे. त्यामुळे अनेकांनी चिकन व मटणाकडे मोर्चा वळवला असून, शाकाहारींनी कडधान्याला पसंती दिली आहे. 

भाज्यांचे व मासळीचे भाव वाढल्याने रोजच्या जेवणामध्ये आता कडधान्य व डाळीचा वापर जास्त प्रमाणात करावा लागतो आहे. भाववाढीमुळे आता खर्च चालविणेही अवघड झाले आहे. 
- सरिता पाटील, गृहिणी 

भाज्यांची आवकच कमी झाल्याने भाज्यांचे भाव वाढल्याने भाज्यांची खरेदी ग्राहकांकडून कमी होत आहे. 
- रमेश पाटील, भाजी विक्रेता 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com