जिल्ह्यात अडीच हजार वनराई बंधारे 

महेंद्र दुसार
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

नराई बंधाऱ्याच्या कामाचा कालावधी अल्प (7 ते 15 दिवस) असतो. यामुळे हे बंधारे पूर्ण करण्यासाठी आतापासूनच तयारी केली जात आहे. वनराई बंधारा बांधल्यामुळे शेतकऱ्यांना फळे आणि भाजीपाला पिकवण्यासाठी रब्बी हंगामात पुरेशा पाण्याची सोय होईल. शिवाय पशुपक्ष्यांनाही पिण्यासाठी पाणी मिळू शकेल.

अलिबागः पावसाच्या तुरळक सरी अद्यापही सुरू आहेत. त्यामुळे आतापासूनच उन्हाळ्यातील पाणीटंचाई रोखण्यासाठी कृषी विभागाने कंबर कसली आहे. रायगड जिल्ह्यात कृषी विभाग लोकसहभागातून 2 हजार 530 वनराई बंधारे बांधणार आहे. यातील 79 बंधाऱ्यांचे काम पूर्ण झाले आहे. यातून शेतीलाही पाणी मिळणार आहे.
 
पावसाचा जोर कमी झाल्यानंतरही नाले व ओढ्यांमधून पाण्याचा प्रवाह चालू असतो, अशा ठिकाणी पाण्याचा प्रवाह पारंपरिक पद्धतीने अडवून पाण्याचा साठा करून बिगर पावसाळी हंगामासाठी वाढविण्याचा प्रयत्न केला जातो. जिल्ह्यात बांधण्यात येणाऱ्या वनराई बंधाऱ्यात साचलेल्या पाण्याचा चांगला उपयोग येथील शेतकरी करीत आलेले आहेत. जिल्ह्यात 2004 पासून सुरू झालेल्या वनराई बंधाऱ्याच्या निर्मितीमधून काही प्रमाणात भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याचा दावा जिल्हा प्रशासन करीत आले आहे. हे बंधारे पूर्णपणे लोकसहभागातून केले जातात.
 
वनराई बंधाऱ्याच्या कामाचा कालावधी अल्प (7 ते 15 दिवस) असतो. यामुळे हे बंधारे पूर्ण करण्यासाठी आतापासूनच तयारी केली जात आहे. वनराई बंधारा बांधल्यामुळे शेतकऱ्यांना फळे आणि भाजीपाला पिकवण्यासाठी रब्बी हंगामात पुरेशा पाण्याची सोय होईल. शिवाय पशुपक्ष्यांनाही पिण्यासाठी पाणी मिळू शकेल. दर वर्षी कृषी, वन विभाग, सामाजिक वनीकरण, शिक्षण विभाग वनराई बंधारे बांधण्यात पुढाकार घेऊन दिलेला लक्षांक पूर्ण करीत असतात. या विभागांना अद्याप लक्षांक देण्यात आलेला नाही. 

भूर्गभातील पाण्याची पातळा वाढण्यासाठी हे बंधारे उपयुक्त ठरत आहेत. हे बंधारे बांधण्यासाठी खूपच अल्प प्रमाणात खर्च येत असतो. लोकसहभागातून हे काम केले जाते. रोजगार हमी योजनेतूनही या बंधाऱ्यांची कामे केली जातात. 
- पांडुरंग शेळके, 
जिल्हा कृषी अधीक्षक, अधिकारी 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad issue