मुरूडमध्ये 80 लाखांचे नुकसान 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

मुरूड तालुक्‍यात प्रथमच 1170 हेक्‍टरवर असणारी भातशेती बाधित झाली आहे. 2956 शेतकऱ्यांचे साधारणतः 80 लाखांपेक्षा अधिक नुकसान झाले.

मुरूडः तालुक्‍यात भातशेती नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून, शेतकऱ्यांचे 80 लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे.
 
मुरूड तालुक्‍यात सुमारे 4500 मिलिमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली. त्यातूनच अवकाळी पावसाने भातशेतीचे मोठे नुकसान केले आहे. शेतात भाताच्या लोंब्या तयार झाल्या होत्या; परंतु अवकाळी पावसामुळे आलेले भातपीक शेतजमिनीत गाडले गेल्याने तयार झालेल्या भातशेतीचे मोठे नुकसान झाले होते. भातपिकांबरोबरच सुपारी व इतर कडधान्य पिकांनाही अवकाळीने मोठ्या नुकसानीची झळ सोसावी लागली होती. याबाबत मुरूड तहसीलदारांनी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. या अनुषंगाने मुरूडचे तहसीलदार गमन गावीत यांनी गेले चार दिवस स्वतः व तलाठी, मंडळ अधिकारी, तालुका कृषी अधिकारी सूरज नामदास यांच्यासमवेत तालुक्‍यातील प्रत्येक गावातील 2956 शेतबांधावर 1170 हेक्‍टरची शेतीची पाहणी करून पंचनामे केले आहेत. आता मिळणाऱ्या सरकारी मदतीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

मुरूड तालुक्‍यात प्रथमच 1170 हेक्‍टरवर असणारी भातशेती बाधित झाली आहे. 2956 शेतकऱ्यांचे साधारणतः 80 लाखांपेक्षा अधिक नुकसान झाले. ती रक्कम शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. 
- गमन गावीत, तहसीलदार, मुरूड 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad issue