कर्जतमध्ये उघड्या गटारांमुळे अपघाताची भीती 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

शहरातील मुद्रे येथील गुलमोहर रेस्ट हाऊस परिसरात अशीच गटारे आहेत. या गटाराच्या दोन्ही बाजूने भरपूर गवत उगवले आहे. त्यामुळे या वाढलेल्या गवतात गटार दिसेनासे झाले आहे. त्यामुळे हे गवत चारण्यासाठी आलेल्या गाईला गटार दिसले नसल्याने ती चरता चरता गटारात पडली.

कर्जत ः पालिका हद्दीत मागील काळात रस्त्याच्या दुतर्फा सिमेंट कॉंक्रीटची मोठी गटारे बांधण्यात आली; मात्र यापैकी काही गटारांवर झाकणे बसविण्यात आलेली नसल्याने या उघड्या गटारात जनावरे तसेच लहान मुले पडण्याच्या घटना घडत आहेत.

शहरातील मुद्रे येथील गुलमोहर रेस्ट हाऊस परिसरात अशीच गटारे आहेत. या गटाराच्या दोन्ही बाजूने भरपूर गवत उगवले आहे. त्यामुळे या वाढलेल्या गवतात गटार दिसेनासे झाले आहे. त्यामुळे हे गवत चारण्यासाठी आलेल्या गाईला गटार दिसले नसल्याने ती चरता चरता गटारात पडली. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार ही गाय बहुधा दोन दिवसांपासून या गटारात पडली असावी. गटार खोल असल्याने तसेच आजूबाजूला वाढलेल्या गवतामुळे कोणाला कळले नसावे. सुदैवाने ही बाब उशिराने का होईना स्थानिक रहिवाशांच्या लक्षात आली. त्यांनी तत्काळ नगरसेवक नितीन सावंत यांना सांगितली. त्यांनी आपत्ती विभागाच्या कर्मचाऱ्यांना बोलावून त्यांच्या आणि अन्य लोकांच्या साह्याने गटारात पडलेल्या गाईला सुखरूप बाहेर काढले. 
शहरात गटारात जनावरे पडण्याच्या घटना यापूर्वीही अनेक वेळा घडल्या आहेत. तेव्हा मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी गटारे बंदिस्त करण्यात येतील, असे सांगितले होते; मात्र त्यानंतर काही गटारे बंदिस्त झाली, झाकणे बसविली; मात्र अद्यापही उघडी आहेत. 

काही भागातील गटारे उघडी असल्याने जनावरे तसेच लहान मुले पडण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. काही दिवसांपूर्वी अशीच एक म्हैस गटारात पडून तिचा मृत्यू झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. पालिका प्रशासनाने त्वरित अशी उघडी गटारे बंदिस्त करावी; जेणेकरून अशा दुर्घटना घडणार नाहीत. 
- प्रमोद खराडे, मुद्रे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad issue