भिरा - देवकुंड मार्ग सुरक्षित होणार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

रोहा : माणगाव तालुक्‍यातील भिरा, देवकुंड पावसाळी पर्यटकांची सर्वाधिक गर्दी असलेले गाव आहे; मात्र धोकादायक मार्ग असल्याने या ठिकाणी पावसाळ्यात जिल्हा प्रशासनामार्फत पर्यटकांना बंदी घातली जाते. लवकरच या मार्गातील नाल्यांवर लोखंडी पूल बांधून मार्ग सुरक्षित केला जाणार असल्याने पुढील वर्षी येथे बंदी घालण्याची आवश्‍यकता भासणार नाही, अशी माहिती पाटनुस भिरा गावच्या सरपंच नीलम संजय निगडे यांनी दिली. 

भिरा परिसरातील देवकुंड धबधब्याला भेट देणाऱ्या पर्यटकांची वर्षभरातील संख्या दीड ते 2 लाखांच्या घरात आहे. त्यापैकी 70 ते 80 टक्‍के पर्यटक पावसाळ्यात भेट देतात; मात्र सुरक्षिततेच्या कारणास्तव जिल्हा प्रशासन पावसाळ्यात या ठिकाणी पर्यटकांना बंदी घालते. त्यामुळे स्थानिक व्यावसायिकांचे मोठे नुकसान होतेच; परंतु पर्यटकांचाही हिरमोड होत असे. त्यामुळे देवकुंडच्या मार्गात असलेल्या 5 ओढ्यांपैकी 2 मोठ्या ओढ्यांवर पूल बांधण्याची मागणी गावकरी व पर्यटक करीत होते. मागणी मान्य होऊन या दोन्ही नाल्यांवर पूल बांधले जाणार असल्याची माहिती निगडे यांनी दिली. 

साडेसहा लाखांचा खर्च अपेक्षित 
भिरा गाव ते देवकुंड धबधबा हे 7 किलोमीटरचे अंतर जंगलातून पायी चालत जावे लागते. या मध्ये अनेक लहान - धबधबे आहेत. त्यात गडग्याचा ओढा हा 50 ते 60 फूट रुंद व जवळपास 20 फूट खोल आहे. असाच लागडचा ओढा 30 ते 40 फूट रुंद व 15 फूट खोल आहे. अशा प्रकारे अजून 3 लहान ओढे आहेत. देवकुंडकडे जाताना हे ओढे पार करीत असताना वरच्या भागात जर पाऊस झाला; तर या ओढ्यांची पाण्याची पातळी व वेग वाढतो. त्यामुळे ओढ्यातील पर्यटक वाहून जाण्याचे प्रकार घडतात. या दोन मोठ्या ओढ्यांवर पूल बांधण्याचा प्रस्ताव मंजूर झाला असून 5 फूट रुंदी असलेले लोखंडी पादचारी पूल बनवले जाणार आहेत. यासाठी 6.5 लाख अंदाजित खर्च या कामासाठी केला जाणार आहे. 

भिरा ते देवकुंड मार्गावर असलेल्या 2 धोकादायक ओढ्यांवर लोखंडी पुलांचा प्रस्ताव मंजूर झाला असून लवकरच काम सुरू होईल. त्यामुळे देवकुंड मार्गातील धोका कमी होणार असून पावसाळी बंदीची गरज राहणार नाही. 
- नीलम संजय निगडे, सरपंच, भिरा 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raigad Issue