नावंढे गावात बिबट्याची दहशत

बिबट्याचे पंजाचे ठसे तपासणी करताना वनविभाग पथक
बिबट्याचे पंजाचे ठसे तपासणी करताना वनविभाग पथक

खालापूर : खालापुरातील नावंढे गावात सोमवारी सकाळी गवतात लपून बसलेल्या बिबट्याने वन विभागाच्या अधिकाऱ्यांना हुलकावणी दिली असून रात्रभर पहारा ठेवूनसुद्धा बिबट्याचे पुन्हा दर्शन झाले नाही. बिबट्याच्या पंजाच्या ठशाचे निरीक्षण व मोजमाप घेण्यात आले आहे.  मादी असल्यास तिची पिल्लेदेखील असण्याची शक्‍यता वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्‍त केली आहे. 

खालापूरनजीक नावंढे गावात केळवली रेल्वेस्थानकाजवळील रस्त्यावर रवी हाडप यांना सोमवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाले. या वेळी बिबट्याला चाहूल लागल्याने तो गवतात लपून बसला. या घटनेची माहिती मिळताच वनपाल आर. व्ही. नागोठकर, वनरक्षक महानंदा फड, अपर्णा खटावकर, व्ही. बी. खांदाजे, व्ही. ए. कातकडे, शशिकांत पाटील यांचे पथक नावंढे गावात पोहोचले होते. मात्र तोपर्यंत बिबट्या वाढलेल्या गवताचा फायदा घेत तेथून पळून गेला. 

बिबट्याच्या पंजाच्या ठशाचा माग घेत वन विभागाने काही काळ येथे शोधमोहीम राबविली. परंतु येथे गवत मोठ्या प्रमाणावर वाढल्याने उंच इमारतीवरून बिबट्याच्या हालचालीवर लक्ष ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. रात्रभर पहारा देऊनसुद्धा बिबट्या पुन्हा न दिसल्याने ग्रामस्थांमध्ये धास्ती वाढली आहे.

वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून ग्रामस्थांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पनवेल येथून सहायक वनसंरक्षक एन. एन. कुप्ते यांना बोलाविण्यात आले होते. त्यांनी पंजाच्या ठशांचे निरीक्षण व मोजमाप घेतले आहे. 

नावंढे गावात कोंबड्यांच्या पोल्ट्री मोठ्या प्रमाणात आहेत. मेलेल्या कोंबड्या उघड्यावर टाकण्याचे प्रकार येथे अनेकदा घडतात. त्यामुळे भक्ष्याच्या शोधात बिबट्या या भागात आल्याची शक्‍यतादेखील आहे. या परिसरातील माणकिवली गाव परिसरात तशा सूचना देण्यात आल्या असून वन विभाग सतर्क आहे.
आर. व्ही. नागोठकर, वनपाल, खालापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com