महाडमध्ये प्रवाशांची गैरसोय 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

महाड : मुंबई - गोवा महामार्गावर कोकणातील महत्त्वाचे मध्यवर्ती स्थानक असलेल्या महाड आगारात चालक आणि वाहकांच्या कमतरतेमुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. अनेक चालक आणि वाहकांची बदली झालेली असताना त्याच्या जागी नव्याने भरती झाली नसल्याने एसटीच्या फेऱ्याही कमी झाल्या आहेत. त्यामुळे एसटीच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. 

महाड : मुंबई - गोवा महामार्गावर कोकणातील महत्त्वाचे मध्यवर्ती स्थानक असलेल्या महाड आगारात चालक आणि वाहकांच्या कमतरतेमुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. अनेक चालक आणि वाहकांची बदली झालेली असताना त्याच्या जागी नव्याने भरती झाली नसल्याने एसटीच्या फेऱ्याही कमी झाल्या आहेत. त्यामुळे एसटीच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. 

मुंबई - गोवा महामार्गावर महाड एसटी आगार महत्त्वाचे आणि मध्यवर्ती आगार मानले जाते. येथून कोकणसह कोल्हापूर, जळगाव, अक्कलकोट, पुणे, मुंबई, बोरिवली, शिर्डी या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. महाड आगारात नेहमीच बसेसची वर्दळ असते. महाड एसटी आगारातून दररोज 18 ते 20 हजार प्रवासी प्रवास करत असतात. बाहेरील आगारांच्या अनेक गाड्या या ठिकाणी थांबत असतात.

महाड आगारात लांब पल्ल्यांच्या गाड्यांसह ग्रामीण भागामध्ये स्थानिक बससेवाही सुरू असते. ही सेवा ग्रामीण भागांमध्ये शाळकरी मुले, तसेच कामधंद्यानिमित्त तालुक्‍याच्या ठिकाणी येणाऱ्या प्रवाशांसाठी उपयुक्त असते. आगारातून दररोज 135 फेऱ्या चालवल्या जातात. यासाठी 132 वाहक व 132 चालक अशा 264 कर्मचाऱ्यांची आवश्‍यकता आहे. याशिवाय काही अतिरिक्‍त चालक, वाहकही असतात. त्यामुळे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आठवडा सुट्टी देणे शक्‍य होत असते. 

दैनंदिन वेळापत्रक कोलमडले 
महाड आगारातून यापूर्वी 62 वाहक, चालकांची बदली झाल्याने त्यांना बदलीच्या ठिकाणी पाठविण्यात आले आहे; परंतु त्यांच्या जागी नव्याने चालक, वाहक हजर झालेले नाहीत. त्यामुळे महाड बस आगारात सध्या 56 चालक, वाहकांची कमतरता आहे. महाड एसटी आगारात 264 चालक, वाहकांपैकी केवळ 208 चालक, वाहक सद्यस्थितीत काम करत आहेत. त्यामुळे एसटीच्या फेऱ्या चालवायच्या असतील, तर सध्या काम करणाऱ्या चालक-वाहकांना अतिरिक्त काम करावे लागत आहे. चालक, वाहकांच्या कमतरतेमुळे दैनंदिन वेळापत्रक कोलमडले आहे. याचा फटका एसटीच्या उत्पन्नावर होत आहे. चालक, वाहक नसल्याने अनेकदा ग्रामीण भागातील वस्तीच्या बस उशिरा सुटतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरी पोहचण्यास उशीर होत असल्याचे विद्यार्थी वैभव कदम याने सांगितले. 

महाड आगारामध्ये चालक-वाहकांची कमतरता असली, तरीही उपलब्ध चालक-वाहकांचे नियोजन करून कारभार चालवला जात आहे. लवकरच महाड आगारात चालक-वाहक उपलब्ध होतील. 
- ए. पी. कुलकर्णी, आगार व्यवस्थापक, महाड 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raigad Issue