जंजिरा,पद्मदुर्ग येथे प्रवासी जेट्टी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 डिसेंबर 2019

मुरूड : ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यासह पद्मदुर्ग किल्ल्यावर तरंगती प्रवासी जेट्टी व्हावी, यासाठी पुरातत्त्व खाते, दिल्ली यांच्याकडे पाठपुरावा करणार असून मेरिटाईम बोर्डाला ना हरकत दाखला मिळवून देण्यासाठी शिकस्त करू, असे प्रतिपादन रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी केले.

मुरूड : ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यासह पद्मदुर्ग किल्ल्यावर तरंगती प्रवासी जेट्टी व्हावी, यासाठी पुरातत्त्व खाते, दिल्ली यांच्याकडे पाठपुरावा करणार असून मेरिटाईम बोर्डाला ना हरकत दाखला मिळवून देण्यासाठी शिकस्त करू, असे प्रतिपादन रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी केले.

मेरिटाईम बोर्डाकडून सादर केलेल्या पद्मदुर्ग व जंजिरा किल्ल्यासाठी ‘सागरमाला’ योजनांतर्गत अनुक्रमे ८ कोटींच्या प्रवासी जेट्टीच्या प्रस्तावास सीआरझेडकडून हिरवा कंदील मिळाला आहे. एसईआयएए खात्याकडूनदेखील तत्त्वत: मान्यता मिळाली. मात्र दीड वर्षापासून पुरातत्त्व विभागाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही. यावर पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी जेट्टी आवश्‍यक असून यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

मुरूडचा पाण्याच्या प्रश्‍नासंदर्भात १ कोटी १० लाख लोकवर्गणी सरकारने माफ केली. तद्वतच मुरूडच्या समुद्र सुशोभीकरणाच्या २८ कोटींच्या प्रस्तावावर सरकारचे सहकार्य घ्यावे लागेल, याकडे त्यांनी लक्ष वेधले. या वेळी मुरूड पत्रकार संघाने मुरूड आगारासाठी पर्यटनस्थळी किमान नवीन १० एसटी बसेस मिळाव्यात, या मागणीचे निवेदन त्यांना दिले.

या वेळी मुरूडच्या नगराध्यक्षा स्नेहा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मंगेश दांडेकर, पाणीपुरवठा सभापती प्रमोद भायदे, नगरसेवक अशोक धुमाळ, माजी उपनगराध्यक्ष अतिक खतीब, माजी नगरसेवक संजय गुंजाळ, नितीन पवार, फैरोज घलटे, इम्तिहाज कादिरी, अली कौचाली आदी उपस्थित होते.

शेकापसोबत आघाडी कायम
सरकार स्थापनेत शिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाची महाआघाडी झाली असली, तरी जिल्ह्यातील शेकाप हा आमचा सहकारी पक्ष राहणार आहे. जिल्ह्यातील आघाडी अशीच अविरत अबाधित राहणार असून शेकापला मुख्य प्रवाहात समाविष्ट करण्यात येणार असल्‍याचे पत्रकारांशी बोलताना स्‍पष्‍ट केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raigad Issue