पेणमध्ये नागरीप्रश्‍नांवर शिवसेना आक्रमक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

या समस्या लवकरात लवकर सोडण्यात याव्यात; अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मुख्याधिकारी अर्चना दिवे यांना देण्यात आला. या वेळी त्यांना जाबही विचारण्यात आला.

पेण : नागरिकांना सतावणाऱ्या अनेक समस्यांविरोधात शिवसेना आक्रमक झाली असून, उपजिल्हाप्रमुख नरेश गावंड, महिला आघाडीप्रमुख दीपश्री पोटफोडे, शहरप्रमुख सुधाकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (ता. 15) पालिकेवर धडक देऊन नागरिकांच्या विविध समस्यांचे निवेदन दिले. या समस्या लवकरात लवकर सोडण्यात याव्यात; अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मुख्याधिकारी अर्चना दिवे यांना देण्यात आला. या वेळी त्यांना जाबही विचारण्यात आला.
 
या वेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नरेश गावंडे, महिला आघाडीप्रमुख दीपश्री पोटफोडे, शहरप्रमुख सुधाकर पाटील, उपतालुकाप्रमुख भगवान पाटील, जयराज तांडेल, अच्युत पाटील, प्रसाद देशमुख, नंदू मोकल, नरेश सोनावणे, विशाल दोषी यांच्यासह महिला आघाडी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
या वेळी निवेदनही देण्यात आले. त्यामध्ये पेण शहरातील तुंबलेली गटारे, अस्वच्छता, अतिक्रमण, बेकायदा जागोजागी थाटलेले चिकन सेंटर, अशुद्ध पाणीपुरवठा, जागोजागी फुटलेले रस्ते तसेच भटक्‍या कुत्र्यांचा प्रश्‍न मांडण्यात आला. 

प्रवासाची घाई, पण बसच नाही

शहरातील मुख्य रस्त्यावर पेण टॉकीजपासून ते गांधी मंदिरपर्यंत मुख्य रस्ता तसेच मागील बाजूस असलेला कोतवाल चौक ते कोळीवाडा चौक अंतोरा रोड, पालिकेपासून ते सरकारी दवाखान्यापर्यंत तसेच चिंचपाडा रोड या रस्त्यांवर लावण्यात आलेल्या हातगाड्या व दुचाकी, चारचाकी वाहने यामुळे वाहतुकीचा प्रश्‍न निर्माण होत आहे. सरकारी दवाखान्यांमध्ये रुग्णांना ने-आण करणे कठीण होत आहे. या रस्त्यावरील अतिक्रमण हटवून तसेच नो-पार्किंग बोर्ड लावून येथील वाहतूक सुरळीत करावी. कासार तळा व साई मंदिर परिसरात स्वच्छता करावी. तेथे स्त्रिया-पुरुषांकरिता स्वच्छतागृहाची व्यवस्था करावी. शहरातील साई मंदिर परिसरात, शंकर नगर व गोदावरी नगर येथील बगिच्यात ओपन जीमची व्यवस्था करावी. कोर्टाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील खचलेली मोरी त्वरित दुरुस्त करावी. महाडिक वाडी व डोंगरीवरील गोळीबार मैदानापर्यंतचा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावा.

स्वच्छतेसंदर्भात तातडीने कारवाई करण्यात येईल. साई मंदिर परिसरात पुरुष व महिलांसाठी स्वच्छतागृह बांधण्याकरिता प्रस्ताव पाठवण्यात येईल. तेथे तातडीने चालते-फिरते स्वच्छतागृह ठेवण्यात येईल. ज्येष्ठ नागरिकांची बसण्याची व्यवस्थाही करण्यात येईल. चारचाकी व दुचाकी वाहनांचे अनधिकृत पार्किंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याकरिता आरटीओ व पोलिसांचे सहकार्य अपेक्षित आहे. त्याकरिता पत्रव्यवहारही केला आहे. अनधिकृत चिकन सेंटर व अनधिकृत अतिक्रमणांवर लवकरच पालिकेकडून कारवाई करण्यात येईल. 
- अर्चना दिवे, मुख्याधिकारी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad issue