कर्जतमध्ये कृषिपंप चोर बिनबोभाट 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

कमलाकर तुरे यांनी शेतीला जोडव्यवसाय म्हणून आपल्या शेतात भाजीपाला, आंबा कलमांची लागवड केली आहे. त्यांना पाणी उपलब्ध व्हावे याकरिता सहा महिन्यांपूर्वीच बॅंकेतून कर्ज काढून शेतात बोअरवेल खोदून पंप बसविला होता;

कर्जतः गेले वर्षभर कृषिपंप चोरीचे थांबलेले सत्र पुन्हा सुरू झाल्याने तालुक्‍यातील शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. आता हिवाळी भातशेतीसह आंतरपिकांच्या लागवडीकडे शेतकरी वळले आहेत; मात्र पंप चोरीचे प्रकार समोर येत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तालुक्‍यातील कळंब येथील एका शेतकऱ्याचा कृषिपंप अज्ञात चोरट्यांनी पळविला असून, ऐन हंगामात आता शेतीला पाणी कसे द्यायचे, असा प्रश्‍न त्यांना सतावू लागला आहे. यापूर्वीही पंप चोरणाऱ्या टोळीने तालुक्‍यात धुमाकूळ घातला होता. त्यामुळे पोलिसांनी चोरट्यांचा शोध घ्यावा, अशी मागणी होत आहे.
 
कळंब येथील शेतकरी कमलाकर तुरे नेहमीप्रमाणे सकाळी आपल्या शेतावर कामासाठी गेल होते. या वेळी त्यांच्या कूपनलिकेचा पाईप व विद्युत केबल विखुरलेले पडलेले दिसून आले. ते पाहून कूपनलिकेतील पाईपलाईनला बसवलेला विद्युत पंप चोरीला गेल्याचे लक्षात आले. यासंदर्भात तेथूनच जवळच असलेल्या कळंब पोलिस ठाण्यात तक्रार केली असता, पोलिसांनी जागेची पाहणी केली. कूपनलिकेचा पाईप व साहित्य पडलेले व विद्युत पंप चोरीला गेल्याचे दिसून आले. यासंदर्भात पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आहे.

लवकरच अज्ञात चोरट्याचा शोध लावून शेतकऱ्यास शेतीपंप परत मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले. कमलाकर तुरे यांनी शेतीला जोडव्यवसाय म्हणून आपल्या शेतात भाजीपाला, आंबा कलमांची लागवड केली आहे. त्यांना पाणी उपलब्ध व्हावे याकरिता सहा महिन्यांपूर्वीच बॅंकेतून कर्ज काढून शेतात बोअरवेल खोदून पंप बसविला होता; मात्र अज्ञातांनी तो पळविल्याने तुरे हवालदिल झाले आहेत. तुरे यांच्याप्रमाणे अनेक शेतकऱ्यांचे पंप चोरीला गेले आहेत. मात्र, पोलिस कटकट नको म्हणून अनेकांनी तक्रार देण्यात समर्थता दर्शविली नाही. हीच बाब चोरट्यांचा पथ्यावर पडत आहे. 

माणगावातील या भिंतीने घडविला चमत्कार

चोर शोधण्यात पोलिस अपयशीच 
कळंब परिसरात मागील काही महिन्यांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वीच आसे गावातील विद्युत जनित्र चोरीला गेल्याची घटना घडली होती. वारे, सालोख, बोरगाव परिसरातील फार्म हाऊसवरही चोऱ्यांचे प्रकार घडले आहेत; मात्र खेदाची बाब म्हणजे या भुरट्या चोरांच्या मुसक्‍या आवळण्यात पोलिसांना अपयश येत आहे. मागील वर्षात अशीच एक विजेचे पंप चोरणाऱ्या टोळीने कर्जत तालुक्‍यात कहर केला होता. रातोरात अनेकांच्या बोअरवेल तथा कूपनलिकेवरील विजेचे पंप चोरून नेले; मात्र त्याचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले नव्हते. 

कर्जत तालुक्‍यात अनेक वेळा वीजपंप चोरीच्या घटना घडल्या आहे. त्यांचा भुर्दंड आम्हा शेतकऱ्यांना भोगावा लागत आहे. शेतीसाठी किंवा घरगुती वापरासाठी लावलेले पंप चोरी होणे कायमचेच झाले आहे. तरी यावर ठोस प्रतिबंध करावा. 
- दशरथ मुने, बारणे, शेतकरी 

यापूर्वीही अशा चोरीच्या घटना घडूनही त्याला पायबंद घालण्यात पोलिसांना अपेक्षित यश आलेले नाही. मुळातच शेतकरी आर्थिक संकटात असताना अशा घटना शेतकऱ्यांना अजून आर्थिक संकटात टाकतात. चोरट्यांच्या मुसक्‍या आवळल्या पाहिजेत. 
- रमेश कदम, तिवणे, शेतकरी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad issue