मुंबई-गोवा महामार्गाची "धूळ'दाण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 नोव्हेंबर 2019

मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी, खड्डे, अपघात हे नित्याचेच झाले आहे. सध्या पाऊस कमी झाल्याने खड्ड्यांतील दगड वर आले आहेत. उन्हामुळे मातीही सुकली आहे. खड्डे बुजविण्यासाठी खडी, माती यांचा वापर केला जात आहे. काही ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसविण्यात येत आहेत. त्यासाठी बारीक खडीचा वापर केला जात आहे. काही ठिकाणी डांबर खडी टाकून खड्डे बुजविले जात असले तरी त्याच्यावर बारीक खडी टाकली जात असल्याने यावरून वाहने गेल्याने ती उडत आहे.

वडखळः मुंबई-गोवा महामार्गावर खड्ड्यांचे विघ्न कायम असून, आतातर धुळीमुळे वाहनचालकांसह नागरिकांचा श्‍वास कोंडू लागला आहे. विविध पक्षांच्या राजकीय नेत्यांसह सरकारी अधिकाऱ्यांचीही या मार्गावरून ये-जा असते; मात्र असे असतानाही त्यांच्याकडूनही काहीच कार्यवाही होत नसल्याचे चित्र आहे. याचा त्रास मात्र सर्वसामान्य वाहनचालक प्रवाशांना सोसावा लागत आहे. संबंधित यंत्रणेकडून धुळीवर टॅंकरद्वारे पाण्याचा फवारा मारून तात्पुरती उपाययोजना केली जात आहे.
 
मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी, खड्डे, अपघात हे नित्याचेच झाले आहे. सध्या पाऊस कमी झाल्याने खड्ड्यांतील दगड वर आले आहेत. उन्हामुळे मातीही सुकली आहे. खड्डे बुजविण्यासाठी खडी, माती यांचा वापर केला जात आहे. काही ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसविण्यात येत आहेत. त्यासाठी बारीक खडीचा वापर केला जात आहे. काही ठिकाणी डांबर खडी टाकून खड्डे बुजविले जात असले तरी त्याच्यावर बारीक खडी टाकली जात असल्याने यावरून वाहने गेल्याने ती उडत आहे.
 
वडखळ-पेण महामार्ग पूर्णपणे उखडून गेल्याने खड्ड्यांमधून माती वर आली आहे. येथून वाहने गेल्याने प्रचंड प्रमाणात धूळ उडत आहे. महामार्गाचा धुरळा झाला आहे. महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांना धुळीचा सामना करावा लागत आहे. समोरील वाहन दिसत नसल्याने अपघात होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. रात्रीची तर परिस्थिती याहून भयानक असते. पादचाऱ्यांनाही धुळीचा सामना करावा लागत आहे. सध्या रस्त्यावर टॅंकरने पाण्याचा फवारा मारला जात आहे; मात्र हा फवारा महामार्गावर मारला जात असला तरी ऊन पडल्यावर पाणी सुकते. त्यामुळे पुन्हा धूळ उडत असल्याने वाहनचालकांसह प्रवासी व महामार्गाशेजारी असणाऱ्या गावातील नागरिक हैराण झाले आहेत. या महामार्गावर डांबरीकरण करावे, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. 

महामार्गावर उडणारी धूळ जास्त प्रमाणात असल्याने समोरचे वाहन दिसत नाही. त्यामुळे वाहन चालविणे जोखमीचे ठरत आहे. डांबरीकरणाचे काम लवकरात लवकर करावे. 
- शशिकांत पाटील, वाहनचालक 

खड्डे व त्यामधून उडणारी धूळ पाहता आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. त्यामुळे श्‍वसनाचे विकारही होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 
- अभिजित पाटील, स्थानिक नागरिक 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad mumbai-goa rod