जीवना आगरदांडा बंदरांना संजीवनी; विकासासाठी राज्य सरकार आग्रही | mva government | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mva government

जीवना आगरदांडा बंदरांना संजीवनी; विकासासाठी राज्य सरकार आग्रही

अलिबाग : रायगड (Raigad) जिल्ह्यातील जीवना, भरडखोल, आदगाव आणि आगरदांडा बंदराचा ‘सागरमाला’ प्रकल्पांतर्गत (Sagarmala Project) विकास करण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारने (mva government) ५० टक्के हिस्सा देण्यास पुढाकार घेतला. मासेमारी, पर्यटनवाढीच्या दृष्टिकोनातून (tourism development) या बंदरांचा विकास केला जात आहे. या संदर्भात मत्स्यव्यवसाय मंत्री दत्तात्रेय भरणे (Dattatray bharane) आणि रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे (Aditi tatkare) यांच्या सविस्तर चर्चा झाली आहे.

हेही वाचा: कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रीयेला 22 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

त्यांनी दिलेल्या पत्रानुसार लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात पाठपुरावा करण्यात येणार आहे, अशी माहिती खासदार सुनील तटकरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. रायगड जिल्ह्यातील बंदरांचा विकास करताना पर्यटनवाढीसाठी असलेल्या योजनांचाही समावेश करण्यात येणार आहे. सुमारे एक हजार कोटी रुपये निधी या बंदरांच्या विकासासाठी अपेक्षित आहे. नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या या बंदरांमध्ये मासे उतरवण्याच्या सुविधांसह पर्यटकांना उपयुक्त अशा सोयी-सुविधा उभारण्यात येणार आहेत. याचा उपयोग मासेमारी उद्योगाबरोबरच पर्यटन उद्योगालाही होणार आहे, अशी माहिती तटकरे यांनी दिली.

आतापर्यंत विकासापासून दूर राहिलेल्या या बंदरांच्या परिसरातील नागरिकांच्या विकासासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. सहा महिन्यांपूर्वीच खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत केंद्रीय राज्यमंत्री मनसुख मांडविया यांची भेट घेतली घेतली. मासळी उतरवण्यासाठी आवश्यक असलेल्या जेटीसह कोल्ड स्टोरेज, मरिना, आर्ट गॅलरी, स्वच्छतागृह, उपाहारगृह उभारण्यात यावीत, असा हा प्रस्ताव आहे. मुरूड तालुक्यातील आगरदांडा, श्रीवर्धन तालुक्यातील भरडखोल, जीवना आणि आदगाव बंदर परिसरात अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत. या स्थळांना भेटी देण्यासाठी देश- विदेशातील पर्यटक येत असतात. त्यांना आकर्षित करण्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे तटकरे यांनी सांगितले.

जीवना, भरडखोल, आदगाव आणि आगरदांडा ही बंदरे मासेमारीसाठी उपयुक्त आहेत. मात्र तिथे पायाभूत योजनांचा विकास झालेला नाही. काही दिवसांपूर्वी यासंदर्भात बैठक झाली. यात या दुर्लक्षित बंदरांचा विकास करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.

- सुरेश भारती, सहआयुक्त मत्स्यव्यवसाय विभाग रायगड

loading image
go to top