आघाडी सरकार चले जावचा नारा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020

जनादेशाचा अपमान करून सत्तेवर आलेल्या शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली असून, आघाडी सरकारच्या बेफिकिरीमुळे राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले, असा आरोप करत याचा निषेध करण्यासाठी भाजपतर्फे कर्जत येथे तालुकाध्यक्ष मंगेश म्हसकर यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले.

कर्जतः शेतकऱ्यांची फसवणूक आणि महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या निषेधार्थ आज भाजप कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारविरोधात कर्जत शहरातील टिळक चौकात धरणे आंदोलन केले. या वेळी "महाविकास आघाडी सरकार चले जाव'च्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी राग व्यक्त केला.

रेल्वेतील वाचनयात्रेला लवकरच सुरुवात
 
जनादेशाचा अपमान करून सत्तेवर आलेल्या शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली असून, आघाडी सरकारच्या बेफिकिरीमुळे राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले, असा आरोप करत याचा निषेध करण्यासाठी भाजपतर्फे कर्जत येथे तालुकाध्यक्ष मंगेश म्हसकर यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर कर्जत तहसील कार्यालयात जाऊन धरणे आंदोलनाबाबत नायब तहसीलदार सुधीर राठोड यांच्याकडे निवेदन सादर केले.
 
भाजपचा विश्‍वासघात करून कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर सत्ता स्थापन केलेल्या शिवसेनेने शेतकऱ्यांचा विश्‍वासघात केला आहे. सरकार स्थापन करीत असताना शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी आणि आताच्या मुख्यमंत्र्यांनी तसेच कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अवकाळीग्रस्तांना 25 हजार रुपये हेक्‍टरी आणि फळबागांसाठी 50 हजार रुपये हेक्‍टरी मदत देण्याची घोषणा केली होती; पण महाविकास आघाडी सरकारच्या प्रमुखांना आपल्या आश्‍वासनांचा विसर पडला आहे. सरसकट कर्जमाफी करू, सात-बारा कोरा करू, अशा घोषणा करणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यापैकी एकही आश्‍वासन पाळले नाही. हे सरकार सत्तेवर आल्यानंतर गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही. ऍसिड हल्ला, अल्पवयीन मुलींवर अत्याचार, बलात्कार, महिलांना जाळून टाकणे अशा घटना वाढू लागल्याने महिला व तरुण मुलींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यात अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडी सरकारचा भाजपने तीव्र निषेध केला.
 
महिलांवर दररोज हल्ले होत असून, महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा सरकार गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे असे सरकारचे काय कामाचे? सरकार उलथवून टाकायला हवे यासाठी सर्वांनी सरकारच्या धोरणाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. 
- वसंत भोईर, जिल्हा उपाध्यक्ष, भाजप 

कर्जतमधील शेतकऱ्यांनी गॅस पाईपलाईनसाठी जमिनी दिल्या; मात्र शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही. राजनाला कालवा दुरुस्त करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले; परंतु आजही सर्व भागाला पाणी पोहचले नाही. दोन्ही प्रकरणी सरकारने न्याय दिला पाहिजे; अन्यथा आणखी मोठे आंदोलन उभे करू. 
- सुनील गोगटे, पदाधिकारी, किसान मोर्चा 

हे सरकार फसवे असून, त्यांना केवळ आपली खुर्ची टिकवायची आहे. ते खुर्चीची ऊब घेण्यात मश्‍गुल असून, ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्थेकडे त्यांचे लक्ष नाही तर ते केवळ मागील सरकारची विकासकामे थांबवायला आलेले सरकार आहे. 
- दीपक बेहेरे, जिल्हा सरचिटणीस, भाजप 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad-thakare sarkar chale jav....