अंगणवाडी सेविकांना आर्थिक चणचण 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

वाड्या-वस्त्यांमधील घराघरांत जाऊन अंगणवाडी सेविका सरकारच्या योजना पोहचविण्याचे काम करीत आहेत. तुटपुंज्या पगारात सेवा करीत असताना त्यांना दिले जात असलेले मानधनही वेळेवर मिळत नाही. तीन वर्षांपर्यंतच्या मुलांना घडविण्याचे काम करीत असताना लसीकरण, विविध योजना लोकांपर्यंत पोहचविण्याचे कामही प्रामाणिकपणे करीत आहेत.

अलिबागः कोवळ्या वयात मुलांवर शिक्षणाचे संस्कार घडविणाऱ्या जिल्ह्यातील 230 अंगणवाडी सेविकांना आर्थिक चणचण भासू लागली आहे. गेल्या नऊ महिन्यांचे मानधन थकल्याने आता खायचे तरी काय, असा प्रश्‍न त्यांना सतावू लागला आहे. जिल्हा परिषद आणि सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे हा फटका बसल्याचा आरोप त्यांच्याकडून केला जात आहे. 

वाड्या-वस्त्यांमधील घराघरांत जाऊन अंगणवाडी सेविका सरकारच्या योजना पोहचविण्याचे काम करीत आहेत. तुटपुंज्या पगारात सेवा करीत असताना त्यांना दिले जात असलेले मानधनही वेळेवर मिळत नाही. तीन वर्षांपर्यंतच्या मुलांना घडविण्याचे काम करीत असताना लसीकरण, विविध योजना लोकांपर्यंत पोहचविण्याचे कामही प्रामाणिकपणे करीत आहेत. चारशेहून अधिक अंगणवाडी सेविका जिल्ह्यातील 150 अंगणवाड्यांमध्ये काम करीत आहेत. या अंगणवाडी सेविकांना सरकारकडून दर महिन्याला सुमारे सहा हजारपेक्षा अधिक मानधन दिले जाते.

फेरीवाला धोरणाला सर्वपक्षीय विरोध

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प रोहा, सुधागड, उरण, माणगाव, महाड, म्हसळा, कर्जत, पनवेल, खालापूर, मुरूडमधील सुमारे 230 अंगणवाडी सेविकांचे गेल्या अनेक महिन्यांपासून मानधन थकीत आहे. त्यात काहींचे मार्च ते डिसेंबर, जानेवारी ते फेब्रुवारी 2019, एप्रिल ते नोव्हेंबर, एप्रिल ते सप्टेंबर, मार्च ते नोव्हेंबर, ऑगस्ट ते ऑक्‍टोबर, जून ते नोव्हेंबरमधील मानधन मिळाले नाही. ही रक्कम पीएफएमएस प्रणालीद्वारे अद्याप मिळाली नाही. निम्म्याहून अधिक अंगणवाडी सेविकांचा गाडा हा मानधनावरच चालत आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविकांवर उपासमारीची वेळ आली आहे. मानधन देण्याबाबत जिल्हा परिषद कार्यालयासमोर तसेच मंत्रालय स्तरावर अनेक वेळा आंदोलन केले आहे; मात्र अजूनपर्यंत जिल्हा परिषद व सरकारकडून कोणत्याही प्रकारची भूमिका घेण्यात आली नाही. 

आश्‍वासनाकडे दुर्लक्ष 
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढेल. पोषण आहाराची बिले वेळेवर मिळतील, अशी अशा अंगणवाडी सेविकांना निर्माण झाली होती; परंतु अंगणवाडी सेविका मानधनपासून वंचितच राहिल्या आहेत. मानधन देण्याबाबत आश्‍वासन देऊनही जिल्हा परिषदेने याकडे दुर्लक्ष केल्याने अंगणवाडी सेविकांनी तीव्र नाराजी व्यक्‍त केली आहे. 

अंगणवाडी कर्मचारी संघ 
आंदोलन करणार 
अंगणवाडी सेविकांच्या माथी सरकारने अनेक योजनेची माहिती घरोघरी पोहचविण्याचे काम मारले आहे; मात्र त्या बदल्यात दिले जाणारे मानधन तुटपुंजे आहे. त्यामुळे लवकरात लवकर थकलेले मानधन न दिल्यास तीव्र आंदोलन पुकारण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने दिला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad-zp-anganvadi-pement issue