फेरीवाला धोरणाला सर्वपक्षीय विरोध

File Photo
File Photo

मुंबई : पालिकेचे अंतिम टप्प्यात आलेले फेरीवाला धोरण बारगळण्याची शक्‍यता आहे. फेरीवाला धोरणाला सत्ताधारी शिवसेनेसह सर्वच पक्षांनी कडाडून विरोध केला आहे. त्यावर चर्चा करण्यासाठी शनिवारी (ता. 15) विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीत धोरणात बदल होण्याची शक्‍यता आहे.

मुंबईतील बेशिस्त फेरीवाल्यांना शिस्त लावण्यासाठी पालिकेने फेरीवाला धोरण तयार केले. केंद्रीय शहर फेरीवाला समितीच्या धर्तीवर महापालिकेने मुंबईत सात परिमंडळांमध्ये सात फेरीवाला समिती आणि फेरीवाला झोन तयार केले. फेरीवालामुक्त पदपथासाठी 2014 मध्ये त्यांचे सर्वेक्षण केले. नागरिकांकडून हरकती-सूचना मागवल्या. सुमारे 99 हजार 435 जणांनी परवान्यासाठी अर्ज केले. त्यात अटी-शर्ती आणि पुराव्यानिशी अर्ज केलेल्या 15 हजार फेरीवाल्यांना परवान्यांसाठी पात्र ठरवले.

त्यानुसार फेरीवाला झोन तयार केले. फेब्रुवारीच्या अखेरीस परवानेही वितरीत करावेत, असे निर्देश महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी प्रशासनाला दिले. मात्र, नव्या फेरीवाला धोरणामुळे त्रास होणार असल्याचे सांगत स्थानिक रहिवाशांनी विरोध करण्यास सुरुवात केली. त्यांच्या वाढत्या विरोधामुळे आता सर्वपक्षीय लोकप्रतिनिधीही जागे झाले आहेत. राहिवाशांच्या नाराजीचा फटका आपल्याला निवडणुकीत बसेल, अशा भीतीपोटी लोकप्रतिनिधींनी धोरणाविरोधात हरकत घेतली आहे. फेरीवाला झोन आखताना आणि टाऊन वेंडिंग कमिटीत नगरसेवकांना विचारात घेतले नाही. भाजप सरकारच्या काळात फेरीवाला झोन तयार केले आहेत.

नगरसेवकांना त्यातून जाणीवपूर्वक वगळण्यात आले, असा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे. धोरण पूर्णतः चुकीचे असून लोकप्रतिनिधी व नागरिक संभ्रमात आहेत. त्यामुळे धोरणात सुधारणा करावी आणि टाऊन वेंडिंग कमिटीत 227 नगरसेवकांना सामावून घेण्यात येण्यासाठी येत्या शनिवारी (ता. 15) महासभा आयोजित करण्यात आली आहे. महासभेतील सूचनांनुसार राज्य सरकारने धोरणात बदल करावा, अशी मागणी केली जाणार आहे. सभागृह नेत्या विशाखा राऊत यांच्यासह सर्वपक्षीय गटनेत्यांच्या सहीचे पत्र पालिका चिटणीस विभागाला पाठण्यात आले आहे.

मनसेचे फेरीवाला धोरणाविरोधात आंदोलन 
मनसेचे मध्यवर्ती कार्यालय असलेल्या राजगड आणि आसपासच्या काही सोसायट्यांच्या बाहेरही पालिकेने फेरीवाला क्षेत्र घोषित केले आहे. मनसेने फेरीवाला धोरणाला विरोध केला असून त्याविरोधात गुरुवारी (ता. 13) जी उत्तर विभाग कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. प्रशासनाला त्याबाबत जाब विचारण्यात येणार असून मनसे फेरीवाला धोरणाविरोधात अधिक आक्रमक होण्याची शक्‍यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com