पाचशेचे तिकीट दोन हजाराला 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

सुटीच्या काळात रेल्वेस्थानकांतील तिकीट खिडक्‍यांसमोर नेहमीच मोठ्या रांगा लागतात. त्याचा गैरफायदा घेत दलाल 500 रुपयांच्या तिकिटासाठी प्रवाशांकडून 2000 रुपये वसूल करत आहेत.

मुंबई  : सुटीच्या काळात रेल्वेस्थानकांतील तिकीट खिडक्‍यांसमोर नेहमीच मोठ्या रांगा लागतात. त्याचा गैरफायदा घेत दलाल 500 रुपयांच्या तिकिटासाठी प्रवाशांकडून 2000 रुपये वसूल करत आहेत. "स्लीपर'साठी दीड हजार आणि "एसी'साठी 2000 रुपये जादा घेतले जातात, असे सांगण्यात आले. 
रेल्वेस्थानकांतील तिकीट खिडक्‍यांवर लांब पल्ल्याच्या गाड्यांचे आरक्षण आणि तात्काळ तिकीट मिळवण्यासाठी नेहमीच प्रवाशांची गर्दी असते. सकाळी तिकीट खिडकी उघडल्यावर पहिला क्रमांक यावा, यासाठी प्रवासी रात्रभर रांग लावून बसतात. अनेक प्रवासी तिकीट खिडकीसमोर झोपतात. 

या प्रवाशांचे श्रम अनेकदा वाया जातात, कारण स्थानकांतील तिकीट खिडक्‍यांवर काही दलालांनी ताबा मिळवलेला असतो. हे दलाल अरेरावी करत पहिला क्रमांक घेतात आणि जादा रक्कम घेऊन प्रवाशांना विकतात. हे दलाल प्रवाशांकडून 500 ते 2000 रुपये वसूल करतात, असे सांगण्यात आले. 

बूस्टर सॉफ्टवेअरचा वापर 
तिकीट दलाल ऑनलाईन व्यवहारात बूस्टर सॉफ्टवेअरचा वापर करतात. अवैध आयडीद्वारे ते 15 ते 30 सेकंदांत तिकीट काढतात. हे नेटवर्क परदेशातून चालवले जाते. या प्रकाराला चाप लावण्यासाठी पावले उचलली जात असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. 

पाच हजार रुपयांत आयडी 
तिकीट दलाल आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरून पत्ता नसणारे आयडी चार-पाच हजार रुपयांत खरेदी करत होते. आता नवीन आयडीसाठी पत्ता देणे अनिवार्य आहे. अशा आयडीसाठी दलाल 70 ते 100 रुपये देतात. त्यानंतर ते 10-20 तिकिटे काढून आयडी रद्द करतात आणि ती तिकिटे प्रवाशांना दामदुप्पट दराने विकतात. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: railway black tickets