फुकट्या प्रवाशांकडून १२५ कोटींची वसुली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

मुंबई - मध्य रेल्वेने विनातिकीट प्रवाशांकडून तब्बल १२५ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. आठ महिन्यांत २४ लाख ७१ हजार विनातिकीट प्रवासी आणि परवानगीपेक्षा जादा वजनाचे सामान घेऊन जाणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. आर्थिक वर्ष संपण्यापूर्वीच रेल्वेने गेल्या वर्षीपेक्षा सुमारे १३ कोटींचा जादा दंड वसूल केला आहे.

मध्य रेल्वेने विनातिकीट प्रवास आणि सामानाची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यासाठी एप्रिल ते नोव्हेंबरदरम्यान तपासणी अभियान राबवण्यात आले. रेल्वेने २०१७ मध्ये अशी २२ लाख ३४ हजार प्रकरणे नोंदवली होती. या वर्षी आतापर्यंत २४ लाख ७१ हजार प्रकरणांची नोंद झाली आहे. एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांत १२५ कोटी १६ लाखांची दंडवसुली झाली असून, २०१७ मध्ये ११२ कोटी ३३ लाखांचा दंड वसूल करण्यात आला होता. त्यावरून विनातिकीट प्रवाशांचे प्रमाण वाढल्याचे स्पष्ट होत आहे. 

मध्य रेल्वे प्रशासनाने विनातिकीट प्रवाशांकडून नोव्हेंबर २०१८ मध्ये २१ कोटी ३९ लाखांचा दंड वसूल केला. नोव्हेंबर २०१७ मध्ये ही रक्कम ११ कोटी ६६ लाख रुपये होती. त्यावरून एका महिन्याच्या वसुलीत सुमारे ८३.४५ टक्के वाढ झाल्याचे आढळते. अन्य व्यक्तींच्या आरक्षित तिकिटावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांवरही कारवाई करण्यात आली आहे. नोव्हेंबरमध्ये ७८९ गुन्हे दाखल करण्यात आले असून, तीन लाख ६९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

Web Title: Railway Passenger 125 Crore Recovery