रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे आई-वडिलांना मिळाली मुलगी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

मुलीच्या मुंबईतील पालकांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर बाल न्यायालयाच्या परवागीने पोलिसांनी तिला आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. 

मुंबई : घरातून काही कारणास्तव बाहेर पडलेली आणि नंतर पालकांना न सांगता मुंबईबाहेर निघून गेलेल्या अल्पवयीन मुलीला वडाळा रेल्वे पोलिसांनी सोमवारी (ता. १२) पालकांच्या ताब्यात दिले.

हार्बर मार्गावरील सॅंडहर्स्ट रोड रेल्वेस्थानकात शुक्रवारी (ता.९) बराच वेळ एकाच ठिकाणी चिंतेत बसलेली (नाव बदलेले) मारिया (१५) स्थानकात कार्यरत पोलिस कॉन्स्टेबल शाम शेळके यांच्या नजरेस पडली. त्यांनी विचारपूस केली असता आपण अनाथ असून दिल्ली येथील बालिका आश्रमातून पळून आल्याचे मुलीने सांगितले. मात्र आश्रमात राहत असलेल्या मारियाकडे मोबाईल कसा? असा संशय शेळके यांना आला. त्यांनी महिला हवालदार सविता मिस्त्री यांच्या मदतीने मारियाला ताब्यात घेतले.

रेल्वे पोलिस ठाणे वडाळा येथे कायदेशीर कारवाई करून तिला बालसुधारगृह डोंगरी येथे ठेवण्यात आले होते. दरम्यान, अधिक तपास केला असता मुलीच्या मुंबईतील पालकांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर बाल न्यायालयाच्या परवागीने पोलिसांनी मारियाला तिच्या आई-वडिलांच्या ताब्यात दिले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: railway police find the missing girl in mumbai