रेल्वे स्थानकांच्या नामांतरासाठी सर्व पक्षांचा आटापिटा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जानेवारी 2017

मुंबई - राजकीय श्रेय पदरात पाडून घेण्यासाठी राज्यातील रेल्वे स्थानकांच्या नामांतरांचा आटापिटा सर्वपक्षीयांनी चालवला असून, मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकाला शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे, तर नागपूर रेल्वे स्थानकाला आद्यसरसंघचालक केशव बळीराम हेडगेवार यांचे नाव देण्याची मागणी केली जात आहे. मुंबई व नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर रेल्वे स्थानकांच्या नामांतराचा मुद्दा ऐरणीवर येण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. 

नागपूर येथील नुकत्याच संपलेल्या हिवाळी अधिवेशनात सरकारने एल्फिन्सटन रेल्वे स्थानकाचे नाव प्रभादेवी करण्याचा ठराव मंजूर केला. तो केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. याप्रमाणे सत्ताधारी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आदी पक्षांच्या निकटवर्तीयांकडून राज्यातील रेल्वे स्थानकांच्या नामांतराची मागणी पुढे रेटली जात आहे. याबाबत संबंधित विभागाकडे मागणीचे निवेदन देऊन वारंवार पाठपुरावा केला जात आहे. नामांतराच्या मुद्याचे राजकारण करीत श्रेय लाटण्याचा सर्वच राजकीय पक्षांचा मनसुबा असल्याचे सांगितले जाते. 

भाजपच्या निकटवर्तीय संघटनांकडून नागपूर रेल्वे स्थानकाला आद्यसरसंघचालक केशव बळीराम हेडगेवार यांचे नाव देण्याची मागणी केली जात आहे. मुंबईतील वांद्रे टर्मिनस तसेच वांद्रे रेल्वे स्थानकाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी शिवसेनेच्या निकटवर्तीयांकडून केली आहे. पुणे रेल्वे स्थानकास "महात्मा ज्योतिबा फुले' यांचे नाव देण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या संबंधित संघटनेच्या वतीने केली आहे. मनमाड रेल्वे स्थानकाला श्रीमंत महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे नाव देण्याची मागणीही या पक्षाच्या संबंधितांकडून पुढे रेटली जात आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील मौजे कसबे तडवळे येथील कळंब रोड रेल्वे स्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून केली आहे. 

Web Title: Railway stations renamed for all parties to go beyond