कल्याणनजीकच्या आंबिवलीतील रेल्वे बोगदा धोकादायक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जुलै 2019

आंबिवली-टिटवाळा रेल्वे मार्गाखालील बोगद्याचे लोखंडी रॉडही दिसू लागले आहेत. एखादी एक्‍स्प्रेस अथवा लोकल गाडी गेल्यास बोगद्यात मोठ्या प्रमाणात कंपने होतात. परिणामी बोगद्यातील प्लास्टर दुचाकीस्वारांच्या अंगावर कोसळल्याच्या घटनाही घडल्या आहेत.

कल्याण : मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा मार्गावरील आंबिवली रेल्वे स्थानकाजवळील बोगदा धोकादायक झाला आहे. या रेल्वे पुलावरून मोठ्या संख्येने लांब पल्ल्याच्या एक्‍स्प्रेसह उपनगरीय लोकलची वाहतूक होत असून, एखादी दुर्घटना घडण्यापूर्वी त्याची दुरुस्ती करण्याची मागणी कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेने रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.
 
आंबिवली-टिटवाळा रेल्वे मार्गाखालील बोगद्याचे लोखंडी रॉडही दिसू लागले आहेत. एखादी एक्‍स्प्रेस अथवा लोकल गाडी गेल्यास बोगद्यात मोठ्या प्रमाणात कंपने होतात. परिणामी बोगद्यातील प्लास्टर दुचाकीस्वारांच्या अंगावर कोसळल्याच्या घटनाही घडल्या आहेत. हा बोगदा ५० वर्षे जुना असून, दुचाकीस्वारांना आंबिवली पश्‍चिम-पूर्वमध्ये ये-जा करण्यासाठी तो सोईस्कर आहे. मात्र, तो धोकादायक झाल्याने त्याचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करून त्वरित दुरुस्तीची कामे करावीत, अशी मागणी रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिव श्‍याम उबाळे यांनी केली आहे.

दुर्घटनेपूर्वी दुरुस्ती गरजेची
  मुंबईमधील पूल दुर्घटनेनंतर मध्य रेल्वेने कल्याण ते कसारा रेल्वेमार्गावरील धोकादायक पादचारी पूल तोडून नवीन पूल बांधण्याची कामे सुरू केली आहेत. कल्याण ते कसारा रेल्वेमार्गात १० लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. आंबिवलीतील रेल्वे बोगदाही ५० वर्षे जुना असून, त्यावरून ४५० लोकल आणि १५० एक्‍स्प्रेसची दररोज ये-जा होते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने एखादी दुर्घटना घडण्यापूर्वी त्याची दुरुस्ती करणे गरजेचे आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Railway Underpass in Dangerous Condition Near Ambiwali Railway Station