जयंत पाटलांच्या घरी राज ठाकरे बैठकीला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

बैठकीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीत मनसे सहभागी होणार असल्याच्या राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या घरी आज महत्वाची बैठक पार पडली असून या बैठकीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे उपस्थित होते. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याचा तपशील समजू शकला नसला तरी या बैठकीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीत मनसे सहभागी होणार असल्याच्या राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

जयंत पाटील यांच्या मुंबईतील घरी सकाळी ही बैठक पार पडली. या बैठकीला राज ठाकरेंसह जयंत पाटील, राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, शेकापचे नेते आमदार जयंत पाटील उपस्थित होते. अजित पवार यांच्या पुढाकाराने ही बैठक घेण्यात आली असून ही बैठक सुमारे दोन तास सुरू होती. या बैठकीत विरोधकांची महाआघाडी आणि ईव्हीएम विरोध यावर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

शिवसेना-भाजपच्या विरोधात सर्व विरोधक एकवटले आहेत. महाआघाडीचे माध्यमातून शिवसेना-भाजपला रोखण्याची रणनीती विरोधक आखत आहेत. या महाआघाडीत सर्व विरोधी पक्षांसह राज ठाकरे यांच्या मनसेने ही सहभागी व्हावे यासाठी प्रयत्न करण्यात येतोय. शिवाय ईव्हीएम विरोधात देखील आंदोलन करण्याचा निर्णय सर्व विरोधी पक्षाने घेतला असून त्याची रणनीती आखण्यासाठी ही बैठक घेतली असल्याचं ही बोललं जात आहे. आज राज ठाकरे भेटीत काय ठरले हे लवकरच जाहीर केले जाईल असे सांगत बैठकीतील अधिक तपशील सांगण्यास जयंत पाटील यांनी नकार दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raj Thackeray attends meeting at the Jayant Patil s house