ठाकरे बंधुंचे होणार मनोमिलन; राज ठाकरे येणार शपथविधीला?

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 27 November 2019

उद्धव ठाकरेंच्या या शपथविधी सोहळ्याला राज ठाकरे उपस्थित राहणार का हाच सगळीकडे चर्चेचा विषय ठरला आहे. उद्धव ठाकरे भावाला निमंत्रण देणार का आणि ते या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीला उपस्थित राहणार का यावर तर्क-वितर्क लढवले जात आहेत. 

मुंबई : मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेले असतानाच आता शपथविधीची तयारी सुरू आहे. महाविकासआघाडीचा शपथविधी उद्या (ता. 28) पार पडेल. पण उद्धव ठाकरेंच्या या शपथविधी सोहळ्याला राज ठाकरे उपस्थित राहणार का हाच सगळीकडे चर्चेचा विषय ठरला आहे. उद्धव ठाकरे भावाला निमंत्रण देणार का आणि ते या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीला उपस्थित राहणार का यावर तर्क-वितर्क लढवले जात आहेत. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

राज ठाकरेंनी शिवसेनेतून बाहेर पडत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. तेव्हापासूनच उद्धव व राज या भावांमध्ये धुसफूस सुरू आहे. घरातील या वादामुळे अनेक गैरसमज पसरवले गेले. आता मात्र उद्धव ठाकरेंच्या या आनंदाच्या क्षणी राज उपस्थित राहतात का हे बघणे औत्सुक्याचे असेल. 'आम्ही सर्वांना निमंत्रण देऊ राज ठाकरे आले तर आम्हाला आनंदच होईल,' असे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले. त्यामुळे राज ठाकरे कुटूंबियांसह उद्धव ठकरेंच्या शपथविधी सोहळ्याला हाजेरी लावण्याची शक्यता आहे. तसेच राज यांचा बंगला कृष्णकुंज हा शिवतीर्थाशेजारीच असल्याने ते शपथविधीला येण्याची दाट शक्यता आहे.  

आमचं सूर्ययान मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर उतरलं : संजय राऊत

मनसेच्या राजू पाटलांना मिळणार मंत्रीपद?
मनसेचे निवडून आलेले एकमेव आमदार राजू पाटील यांनाही राष्ट्रवादीच्या कोट्यातून राज्यमंत्री मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लोकसभा निवडणूकीपासूनच राज ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला होता. राष्ट्रवादीसोबत मनसेचे चांगले संबंध जुळले होते. विधानसभा निवडणूकीतही त्यांनी एकमेकांना सहकार्य केले. आता महाविकासआघाडीमुळे मनसेचा पाठिंबा शिवसेनेला मिळेल अशी चर्चा सुरू आहे. 

79 वर्षांच्या वस्तादाचे डाव पैलवानांना कळलेच नाही

शिवतीर्थावर होणाऱ्या उद्याच्या शपथविधीसाठी आजपासूनच जय्यत तयारी सुरू झाली आहे. शिवसेना व महाविकासआघाडीचे कार्यकर्ते आजपासूनच तयारीला लागले आहेत. अनेक राजकीय दिग्गज या शपथविधीला उपस्थित होणार आहेत. सोनिया गांधी, अमित शहा व इतर राज्यांचे मुख्यमंत्री या सोहळ्याला उपस्थित राहतील अशी माहिती आहे.    


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raj Thackeray possibility to attend CM Uddhav Thackeray oath taking ceremony