"मी सांगतो, तुम्ही जिम ओपन करा, बघू काय होतं ते" - राज ठाकरे

प्रशांत बारसिंग
Tuesday, 11 August 2020

जिम व्यावसायिक आणि बॉडीबिल्डर्सनी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी कृष्णकुंजवर भेट घेतली.

मुंबई : "मी सांगतो तुम्ही जिम ओपन करा, बघू काय होतं ते, असा सल्ला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यायामशाळा चालकांना दिला. कोरोना व्हायरसमुळे देशासह राज्यात लॉकडाऊन करण्यात आला आणि सर्व व्यवसाय ठप्प झाले. सध्या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव असला तरीही अनलॉकची प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने टप्प्या टप्याने सर्व सेवा सुरळीत करण्यात येत आहेत. परंतु, अद्याप जिम सुरु करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने परवानगी देण्यात आलेली नाही.

त्यामुळे सरकारकडे जिम पुन्हा सुरु करण्याचा मुद्दा उचलून धरावा यासाठी जिम व्यावसायिक आणि बॉडीबिल्डर्सनी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी कृष्णकुंजवर भेट घेतली. त्यावेळी राज ठाकरे यांनी 'तुम्ही जिम ओपन करा, बघू काय होतं.' असा सल्ला जिम व्यावसायिक आणि बॉडीबिल्डर्सना दिला आहे.

 

मोठी बातमी -  विंग कमांडर कॅप्टन दीपक साठे यांच्यावर मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

राज ठाकरे म्हणाले की, 'विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माझे बोलणे झाले आहे. तेही म्हणतात की, जिम सुरु झाले पाहिजेत. आता मी सांगतो, जिम सुरु करा, ज्याला यायचे आहे, तो जिमला येईल. पुढे बोलताना ते म्हणाले की, किती दिवस लॉकडाऊनमध्ये काढणार आहात, प्रत्येकाने आपली काळजी घ्या, प्रत्येकाची काळजी घ्या. केंद्राने जारी केलेल्या गाईडलाईन्स दिल्या आहेत, त्या पाळून काळजी घ्या.' असे आवाहनही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे.

फिजिकल डिस्टंन्सिंगबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, गोल्फ आणि टेनिस यापेक्षा जास्त फिजिकल डिस्टन्स काय असू शकतो? मधू इथे आणि चंद्र तिथे. मी खेळायला सुरुवात केली, काय होतय ते बघूया. मार्केट सुरु आहेत सगळे. हा सगळा मूर्खाचा बाजार सुरु आहे. बाकी सगळ्या गोष्टी सुरु आहेत, मग जिम का बंद आहेत, तेच कळत नाही.

मोठी बातमी - राजस्थानातील राजकीय भूकंपावर मुंबईतून रेस्क्यू ऑपरेशन, पायलटच्या घरवापसीचं मुंबई कनेक्शन

राज्य सरकारवर निशाणा साधत राज ठाकरे म्हणाले की, केंद्र सरकार सांगत आहे की, जिम सुरु करा, विमानतळ सुरु करा. राज्य म्हणतयं, आम्ही नाही करणार, मग राज्याला काही वेगळी अक्कल आहे का?' असा सवाल उपस्थित करत राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणाही साधला आहे. तसेच पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, जिम सुरु केल्यानंतर तुम्ही कशी काळजी घेणार?' राज ठाकरेंच्या या प्रश्नावर उत्तर देत जिम व्यावसायिकांनी सांगितले की, 'कार्डिओ बंद करणार असून सॅनिटायझेशनही करणार आहोत. तसेच एक तासाची एक बॅच अशा पद्धतीने जिम सुरु करण्याचा मानस असल्याचे सांगितले.

( संकलन - सुमित बागुल )

raj thackeray tells gym owners to re open their gyms read full news


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raj thackeray tells gym owners to re open their gyms read full news