राज ठाकरे कोलकाताकडे रवाना

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

मनसे अध्यक्ष राज ठाकरे ईव्हीएम विरोधात आक्रमक झाले असून ते बुधवारी (ता. 31) तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची भेट घेणार आहेत.

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे ईव्हीएमविरोधात आक्रमक झाले असून ते बुधवारी (ता. 31) तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची भेट घेणार आहेत.

यासाठी ते आज सकाळी पश्चिम बंगालकडे रवाना असून त्यांच्यासोबत मनसे नेते बाळा नांदगावकर, अनिल शिदोरे आणि सचिव सचीन मोरे ही रवाना झाले आहेत. ईव्हीएम विरोधात देश पातळीवर आंदोलन उभे करण्यासाठी राज ठाकरे ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा करणार आहेत.

राज ठाकरे तीन दिवसांच्या कोलकाता दौऱ्यावर असून बुधवारी (ता. 31) ते ममता बनर्जींची भेट घेणार आहेत. या भेटीत ते ममता बॅनर्जी यांना भेटून ईव्हीएम विरोधातील आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. यानंतर राज ठाकरे आणखी काही प्रमुख राजकीय नेत्यांची भेट घेऊन 1 ऑगस्टला मुंबईत परतणार आहेत.

लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी मोदी-शाहांविरोधात 'लाव रे तो व्हिडिओ'चे हत्यार उपसले  होते. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत ईव्हीएमच्या विरोधात रान उठवून भाजप-शिवसेनेच्या नाकी नऊ आणण्याचा प्रयत्न राज ठाकरे करणार असल्याचे समजते आहे.

राज ठाकरेंनी ईव्हीएम विरोधात भूमिका घेतली असून काही दिवसांपूर्वी त्यांनी दिल्लीत निवडणूक आयोगाची भेट घेतली होती. त्या भेटीत पुढच्या काळात होणाऱ्या निवडणुका ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर घ्याव्यात अशी मागणी निवडणूक आयोगाला केली होती. त्यानंतर त्यांनी यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही भेट घेतली होती. तर कालच त्यांनी या मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेस चे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, शेकापचे नेते जयंत पाटील भेट घेतली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raj Thakare to visit Kolkata