esakal | राजाबाई टॉवरची पर्यटकांना आता ‘हेरिटेज सफर’ Mumbai
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

राजाबाई टॉवरची पर्यटकांना आता ‘हेरिटेज सफर’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : दीडशे वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या मुंबई (Mumbai) विद्यापीठाच्या राजाबाई टॉवर आणि दीक्षान्त सभागृहाची पर्यटकांना सफर करण्याची संधी मिळणार आहे. जागतिक पर्यटन दिनानिमित्ताने यासाठी मुंबई विद्यापीठ (university) आणि राज्य पर्यटन विकास विभागात करार झाला असून, पुढील आठवड्यापासून देश-विदेशातील पर्यटकांना राजाबाई टॉवरची हेरिटेज सफर करता येणार आहे. पर्यटन विभागाचे संचालक मिलिंद बोरीकर आणि मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. बळीराम गायकवाड यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

पर्यटकांना प्रत्येक सुटीच्या दिवशी राजाबाई टॉवर आणि दीक्षान्त सभागृह पाहायला मिळणार आहे. यासाठी या पर्यटन सफरीला ‘हेरिटेज वॉक’ असेही नाव दिले जाणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागातील विद्यार्थी या पर्यटन सफरीसाठी ‘इंटर्न’ म्हणून महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. यासाठी ऑनलाईन बुकिंग ‘टुरिस्ट गाईड असोसिएशन’ या खासगी संस्थेच्या माध्यमातून केली जाणार असून देशातील पर्यटकांना १००; तर विदेशी पर्यटकांना ३०० रुपये इतकी रक्कम यासाठी मोजावी लागणार आहे.

हेही वाचा: नागपूर विद्यापीठाच्या सिंथेटिक ट्रॅकचे काम सुसाट

मुंबई विद्यापीठाच्या या हेरिटेज इमारतीच्या सफारीसंदर्भात राज्य सरकारने विद्यापीठाला या दोन्ही इमारती पर्यटकांसाठी खुल्या कराव्यात, असा प्रस्ताव मागील वर्षी डिसेंबरमध्ये पाठवला होता. त्यापूर्वी मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ. धनराज कोहचाडे यांनीही मागील अनेक महिन्यांपासून मागणी लावून धरली होती. आता हा करार झाल्याने कोहचाडे यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

हेही वाचा: मुंबईतील कोरोना गंभीर रुग्णांची संख्या दुपटीने कमी

१८६९ मध्ये पायाभरणी

मुंबईतील ख्यातनाम उद्योजक प्रेमचंद रॉयचंद यांच्या आईचे नाव या टॉवरला देण्यात आले आहे. राजाबाई टॉवर वास्तूची पायाभरणी १ मार्च १,८६९ मध्ये झाली. हा टॉवर आणि बाजूला असलेले दीक्षान्त सभागृह या दोन्हीसाठी तब्बल दहा वर्षांचा कालावधी लागला. नोव्हेंबर १,८७९ मध्ये या टॉवरचे बांधकाम पूर्ण झाले. जगविख्यात आर्किटेक्ट सर जॉर्ज गिल्बर्ट स्कॉट यांच्या कल्पनेतून आणि खास गॉथिक शैलीत हा राजाबाई टॉवर साकारला. त्याची या टॉवरच्या पायात नोंद ही ‘सी. टी. एस. बीएम, एडी १८७७’ अशी दोन ठिकाणी पाषाणावर कोरण्यात आली आहे. हीच खूण विद्यापीठाच्या टॉवरच्या उभारणीची महत्त्वाची खूण आहे.

दृष्टिक्षेप

राजाबाई टॉवर एकूण २८० फूट उंच आहे.

वर माथ्यावर २९० पायऱ्या चढून जावे लागते.

टॉवरची रचना ‘गॉथिक’ शैलीच्या माध्यमातून केली आहे

loading image
go to top