रमेश कदम यांच्या मालमत्ता जप्त करा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 मार्च 2017

अण्णा भाऊ साठे महामंडळातील गैरव्यवहार - मुंबई विशेष सत्र न्यायालयाचे आदेश
मुंबई - अण्णा भाऊ साठे महामंडळ गैरव्यवहारप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे निलंबित आमदार रमेश कदम यांना मुंबई विशेष सत्र न्यायालयाने दणका दिला. कदम यांची स्थावर आणि जंगम अशी सुमारे 135 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

अण्णा भाऊ साठे महामंडळातील गैरव्यवहार - मुंबई विशेष सत्र न्यायालयाचे आदेश
मुंबई - अण्णा भाऊ साठे महामंडळ गैरव्यवहारप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे निलंबित आमदार रमेश कदम यांना मुंबई विशेष सत्र न्यायालयाने दणका दिला. कदम यांची स्थावर आणि जंगम अशी सुमारे 135 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

अण्णा भाऊ साठे महामंडळात 250 कोटींचा गैरव्यवहार झाल्या प्रकरणी तब्बल 3700 पानी पुरावे माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागासह सर्व विभागांना दिले होते. कोणतीही प्रक्रिया न राबवता 73 जणांची भरती प्रकरणात नियुक्त झालेल्यांना 20 लाखांचे गृहकर्ज उपलब्ध करून दिले. त्यातले 15 लाख रुपये लाच म्हणून घेण्यात आले. अनेक कर्ज प्रकरणांवर खोट्या सह्या घेतल्या. लाभार्थींचे चेक परस्पर वाटण्यात आले, महालक्ष्मी दूध संस्था, खंडाळी, बारामती दूध संघाला पाच कोटी कागदोपत्री वाटण्यात आले. विधानसभा निवडणुकीत रमेश कदमांनी सहा कोटी 56 लाख रुपये वाटल्याचा आरोप रमेश कदमांवर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी तब्बल 135 कोटी 16 लाख 82 हजार 608 रुपये जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.

सुमारे 400 कोटींपेक्षा जास्त रकमेचा गैरव्यवहार केलेल्या रमेश कदम यांच्या नावावर शेती, कफ परेड येथील प्लॉट्‌स, औरंगाबाद इथली मालमत्ता, 20-25 बॅंक अकाउंट्‌स अशा एकूण 54 मालमत्ता गुन्हे अन्वेषण विभागाला जप्त करण्याचे आदेश विशेष न्यायमूर्ती एस. टंकीवाला यांनी दिले. या गैरव्यवहारप्रकरणी पुणे-नगर रस्त्यावरील "ग्रॅण्ड हयात' या पंचतारांकित हॉटेलमधून सीआयडी पथकाने त्यांना अटक केली होती.

जप्तीचे आदेश
औरंगाबाद येथे शेतजमीन 20 गुंठे, 40 गुंठे, 62 गुंठे
औरंगाबाद येथे 85.66 चौ. मीटरचा व तीन हजार 938 चौ. मीटरचा, 581 चौ. मीटरचे 4 प्लॉट

मुंबई बोरिवली येथे 569 आर झोन एक हजार 149 चौ. फुटांचा फ्लॅट भूमी फ्लोरा इमारतीत
मुंबईत पेडर रोड येथे 685 चौ. मीटर ओपन प्लॉट
येवला येथे 47 चौ. मीटरचा ओपन प्लॉट
सोलापूर येथे 1.38 हे., 0.80हे., 1.20हे., 0.80हे., 0.99 हेक्‍टर जमीन,
ब्रिफकेसमध्ये 4 लाख 43 हजार रु.
कन्झुमर सोसायटीमध्ये 16 लाख 43 हजार 735 रु.
पैठण आयसीआयसीआय खात्यात 39 लाख 85 हजार 200 रु.
एमआयडीसी अंधेरी येथील कॅनरा बॅंकेत 78 हजार 805 रु.
बोरिवली बॅंक ऑफ महाराष्ट्र खात्यात दोन लाख 55 हजार 528 रु.
इंडियन बॅंक अशोकनगर बोरिवली पूर्वच्या एकाच खात्यात रमेश कदम यांच्या नावावर 10 बॅंक अकाऊंट
(14 लाख 42 हजार 837 रु., 53 हजार 300 रु., 42 लाख 77 हजार 203 रु., 16 लाख 94 हजार 553 रु., 33 लाख 95 हजार 350 रु., 14 हजार 220 रु., 43 हजार 519 रु.)
ऍक्‍सिस बॅंक, बोरिवली 25 हजार रु.

काय आहे प्रकरण?
औरंगाबादेत यूपीएससी, एमपीएससी प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी जवळपास 12 कोटी खर्च करण्यात आले आहेत. मात्र, ज्या ठिकाणी हे केंद्र उभे करण्यात येणार होते त्या जागी केवळ तारेचे कुंपण. समाजातील होतकरू तरुण अधिकारी व्हावेत, या उद्देशाने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळात प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी बारा कोटी खर्च करण्यात आले. मंडळातील अधिकाऱ्याला पत्र येईपर्यंत अशा प्रकारची जागा खरेदी केल्याचे व त्यासाठी 12 कोटी खर्च केल्याचे माहीतच नव्हते.

औरंगाबादपासून 20 किलोमीटरवर फेतेपूर गावात 2013 मध्ये 1579 चौरस मीटर जागा खरेदी करण्यात आली. महिंद्रा एंटरप्रायझेस या कंपनीला प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी बांधकाम परवाना देण्यात आला. त्यासाठी तब्बल 12 कोटी देण्यात आले. 1380 चौरस मीटर जागेवर इमारत बांधायची होती आणि खेळाच्या ग्राऊंडसाठी 1008 चौरस मीटर जागा सोडण्यात येणार होती. पण हे सर्व व्यवहार कागदोपत्री राहिले.

Web Title: Ramesh Kadam of the seized property