बलात्कार प्रकरणात सक्तमजुरी कायम

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 नोव्हेंबर 2018

मुंबई - अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या शिक्षकासह एका महिलेला ठोठावलेली दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली. शिक्षकाने असे कृत्य करणे लाजिरवाणे आहे, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदविले.

शाळेतील 12 वर्षांच्या विद्यार्थिनीवर वारंवार बलात्कार केल्याचा आणि तिची अश्‍लील छायाचित्रे काढल्याचा आरोप दत्ता जाधव या शिक्षकावर रायगड पोलिसांनी ठेवला होता. त्याला शाळेतील एका महिलेने साथ दिल्याचाही आरोप होता. पोलिसांनी भारतीय दंड विधानातील 376 कलमासह "पोक्‍सो' (लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण) कायद्याखाली आरोपींवर गुन्हा दाखल केला होता. अलिबाग सत्र न्यायालयाने चार वर्षांपूर्वी या दोघांनाही दोषी ठरवून दहा वर्षे सक्तमजुरी व दंड, अशी शिक्षा ठोठावली होती.

या शिक्षेविरोधात दोषींनी उच्च न्यायालयात अपील केले होते. या खटल्यात अनेक त्रुटी असल्याचा दावा त्यांनी केला होता. अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकाने बलात्कार करण्याची घटना लाजिरवाणी आहे.

सतत धमकावल्यामुळे तिच्या तक्रारीला झालेला उशीरही समजण्यासारखा आहे, असे मत न्यायालयाने व्यक्त केले. मुलीचे कमी वय आणि अन्य साक्षीदारांनी दिलेल्या जबानीवरून या गुन्ह्यातील सत्यता उघड होते, असे न्या. अजय गडकरी आणि न्या. एस. एस. शिंदे यांच्या खंडपीठाने सांगितले आणि सत्र न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला.

Web Title: Rape case Crime Punishment Court