Birds flue नियंत्रणासाठी रॅपिड रिस्पॉन्स टीम; पोल्ट्रीतील पक्षांचे रक्ताचे नमुने घेण्याचे आदेश

Birds flue नियंत्रणासाठी रॅपिड रिस्पॉन्स टीम; पोल्ट्रीतील पक्षांचे रक्ताचे नमुने घेण्याचे आदेश

अलिबाग  : स्थलांतरित पक्ष्यांमुळे कोकणात अनेक पक्ष्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचा अंदाज आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला असून जिल्ह्यात 15 शीघ्र प्रतिसाद पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकातर्फे बर्ड फ्लूला रोखण्याबरोबरच नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. 

कोरोनाच्या संकटानंतर राज्यात बर्ड फ्लू रोगाने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. याचा प्रसार राज्यात वाढत असताना, रायगड जिल्ह्यात या आजाराची अद्याप लागण नसल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली, परंतु या रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी पशुसंवर्धन विभाग सज्ज झाला असून जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुभाष म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली 15 शीघ्र प्रतिसाद पथके (रॅपिड रिस्पॉन्स टीम) तयार करण्यात आली आहेत. या पथकांमार्फत प्रत्येक तालुक्‍यातील कोंबड्यांच्या रक्ताचे नमुने घेण्यात येणार आहेत. आठ दिवसांत हे नमुने घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. ते पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवून त्याचा अहवाल मागवण्यात येणार आहे. 

बर्ड फ्लूच्या भीतीने पोल्ट्री व्यवसाय आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यांनी विक्री भाव निम्म्याने कमी केले आहेत. त्यामुळे सुमारे 30 टक्के उत्पन्न व उत्पादन घटण्याची शक्‍यता पशुसंवर्धन विभागाने व्यक्त केली. पोल्ट्री व्यावसायिकांवर एका वर्षात आलेले हे दुसरे आर्थिक संकट असून यातून मार्ग काढण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत पोल्ट्री व्यावसायिकांना मार्गदर्शन करण्यास सुरुवात झाली आहे. 

दापोली आणि ठाणे येथे बर्ड फ्लूची लागण झाली आहे; मात्र स्थलांतरित पक्ष्यांमुळे याची लागण झाल्याचे समजते. रायगड जिल्ह्यात सध्या एकही बर्ड फ्लूची लागण नाही. याची लागण होऊ नये यासाठी पशुसंवर्धन विभाग सतर्क असून त्यावर ठोस उपाययोजना व फवारणीचे मार्गदर्शन केले जात आहे. तसेच नागरिकांनी चिकन खाण्याबाबत कोणतीही भीती बाळगू नये, असे आवाहन करण्यात येत आहे. 
-डॉ. सुभाष म्हस्के,
जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, रायगड 

Rapid Response Team for Birds Flu Control Order to take blood samples of poultry birds in raigad

---------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com