ठाणे : शिधावाटप दुकानदाराकडून 12 हजाराची लाच स्वीकारणाऱ्या ठाण्यातील शिधावाटप निरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली.
वासुदेव श्रीराम पवार (48) असे अटक करण्यात आलेल्या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव असून तो ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील शिधावाटप कार्यालयात निरीक्षक पदावर कार्यरत आहे.
एसीबी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेतील तक्रारदार यांचे ठाण्यात शिधावाटप दुकान असून या दुकानासंबंधी शासकीय काम करण्यासाठी पवार याने 12 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदार यांनी या प्रकरणी ठाणे एसीबी पथकाकडे फिर्याद दाखल केली. त्यानुसार या घटनेची पडताळणी केली असता त्यात संबंधित शिधावाटप निरीक्षक यांनी लाच मागितल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान, या प्रकरणी बुधवारी एसीबी पथकाने सापळा कारवाईचे आयोजन करून वासुदेव श्रीराम पवार यास 12 हजाराची लाच स्वीकारताना जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात रंगेहात अटक केली. त्याच्या विरोधात ठाणेनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.