अनेक दिवसांपासूनचा सुका घसा ओला करण्यासाठी मुंबईतील तळीरामांनी केलं असं काही...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 4 May 2020

मुंबई पोलिसांच्या ट्वीटर अकाऊंटवर किमान आठ तक्रारी, चेंबुर, कुर्ला परिसरात वाइन शॉप, बिअर शॉप समोर गर्दी

मुंबई : राज्यात कंटेन्मेंट झोन वगळता इतर ठिकाणी दारुची दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आल्यानंतर गेल्या दीड महिन्यापासून दारूपासून लांब राहिलेल्या तळीरामांनी सोमवारी सकाळी सकाळीच वाईन शॉपची दुकाने गाठली. वाईन खरेदीसाठी सर्वात आधी आपला नंबर लागावा म्हणून अनेकांनी थेट दुचाकीवरून वाईनशॉप गाठले. त्यामुळे ठिकठिकाणी वाईन शॉपबाहेर तुफान गर्दी होऊन वाहतुकीची कोंडीही झाल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला आहे. याशिवाय विविध परिसरातील नागरीकांनी मुंबई पोलिसांच्या ट्वीटर अकाऊंटवर फोटो शेअर करून दारूच्या दुकानांबाहेर झालेल्या गर्दीबाबत आठ तक्रारी केल्या आहेत.

अन् दारुची दूकाने उघडलीच नाही... नवी मुंबईतील तळीरामांचा हिरमोड

राज्यात रेड झोनमधील कंटेन्मेंट परिसर वगळता इतर ठिकाणी दारू विक्रीस परवानगी देण्यात आल्याने आज मुंबई, ठाण्यासह राज्यातील अनेक भागात तळीरामांनी दारू विकत घेण्यासाठी दारुच्या दुकानाबाहेर मोठी गर्दी केली. अनेक ठिकाणी दारुच्या दुकानाबाहेर मंडप टाकण्यात आले होते. तर काही ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे म्हणून नागरीकांना उभे राहण्यासाठी दुकानाबाहेर ठरावीक अंतरावर गोल रिंगण करण्यात आले होते. या रिंगणात उभे राहिलेल्यांनाच दारूच्या बाटल्या दिल्या जात होत्या. अनेक ठिकाणी तर तळीरामांनी स्वतःच सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत दारूच्या बाटल्या विकत घेतल्या. काही ठिकाणी सोशल डिस्टन्सिन्गचे तीन-तेरा वाजल्यामुळे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.

अबब! गरिबांच्या जेवणावरही डोळा, 80 हजार जेवणाची पाकीटं खाल्ली तरी कोणी?

कुर्ला, मालाड, माटुंगा, चेंबूर कँम्प येथे अनेक दुकानाबाहेर तळीरामांनी गर्दी केली होती. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. परिणामी पोलिसांना हस्तक्षेपकरावा लागला. पोलिसांना लाऊडस्पीकरवरून नियम आणि शिस्तीचे पालन करण्याचे आवाहन नागरीकांना करावे लागले. काही तळीराम दुचाकींवरून आल्याने चेंबूर कँम्पमध्ये वाहतुकीची कोंडी झाली होती. चेंबूर कँम्पातील वीना वाईन शॉपबाहेर अधिक गर्दी होती. तर दादर शिवाजी पार्क, काळाचौकी, घाटकोपर, कुर्ला, सायन कोळीवाडा, इतर भागातही हीच परिस्थिती होती. लॉकडाऊन शिथील होताच, तळीरामांचा उत्साह ओसांडुन वाहत होता. आधीच लॉकडाऊनमध्ये बंदोबस्त करणा-या पोलिसांच्या वाट्याला आलेल्या आलेल्या नव्या जबाबदारीमुळे  पोलिस त्रस्त झालेले दिसून आले.

शहरातील विविध परिसरात राहणा-या नागरीकांनी दारुच्या दुकानाबाहेर झालेल्या गर्दीचे फोटो शेअर करून मुंबई पोलिसांच्या ट्वीटर खात्यावर याबाबत तक्रारीही केल्या. दिवसभरात अशा किमान आठ तक्रारी नागरीकांनी केल्या होत्या.

this is reaction of opening liquor stores in mumbai read full story


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: this is reaction of opening liquor stores in mumbai read full story