रस्ते खोदकामांवर डक्‍टचा उतारा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

बेलापूर भागात महापालिकेने केलेला डक्‍टचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता नवी मुंबईतील गावे, गावठाण व एमआयडीसीत नव्याने बांधण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या निविदांमध्ये युटिलीटी डक्‍ट तयार करण्याचा समावेश केला आहे. 

-मोहन डगावकर, शहर अभियंता, महापालिका.

नवी मुंबई - नेहमीच्या रस्ते खोदकामांमुळे हैराण झालेल्या वाहनचालक आणि रहिवाशांना दिलासा देण्यासाठी महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाने डक्‍टचा उतारा पर्याय शोधला आहे. सरकारी आस्थापनांकडून अनेकदा कामांसाठी रस्ते खोदले जातात. त्यानंतर त्यांची योग्य दुरुस्ती केली जात नसल्यामुळे पावसाळ्यात ते खराब होऊन त्याचा त्रास नागरिक आणि वाहनचालकांना होतो; परंतु आता नवीन रस्ते बांधताना त्यांच्या कडेला डक्‍ट तयार केले जाणार असल्यामुळे रस्ते खोदण्याची गरज पडणार नाही. याशिवाय या डक्‍टमधील केबल आणि पाईपलाईनचे भाडे महापालिकेला मिळणार आहे. 

नियोजनबद्ध शहर वसवताना नवी मुंबईतील रस्त्यांच्या कडेला युटिलीटी डक्‍ट (भूमिगत बंदिस्त मार्गिका) तयार करण्याचा विसर सिडकोला पडला. त्यामुळे अनेक आस्थापनांकडून वारंवार रस्ते खोदले जातात. यामुळे चांगले रस्ते खराब होतात. एमटीएनएल, महानगर गॅस, महावितरण या सरकारी आस्थापनांसह खासगी कंपन्याही केबल, पाईपलाईन इतर कामांसाठी रस्ते खोदतात. त्यानंतर दुरुस्तीची मलमपट्टी करून गाशा गुंडाळतात. बऱ्याचदा भूमिगत वाहिन्या टाकायच्या असल्याने विशेष मार्गिका नसल्याने रस्ता खोदण्याशिवाय पर्याय नसतो. असे असले तरी खोदलेला रस्ता योग्य प्रकारे दुरुस्त करण्याची तसदी घेतली जात नाही. त्यामुळे पावसाळ्यात या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडतात. त्यात पावसाचे पाणी साचल्यामुळे व वाहने त्यात आदळून आणखी रस्ता खराब होतो. याचा त्रास नागरिक व वाहनचालकांना सहन करावा लागतो. यामुळे रस्त्याचे आयुष्यमान कमी होत असल्याने त्याचा भुर्दंड महापालिकेला सहन करावा लागतो. यावर तोडगा काढण्यासाठी महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाने आता नवे रस्ते बांधताना त्यांच्या कडेला युटिलीटी डक्‍ट व पावर डक्‍ट तयार करण्यास सुरुवात केली आहे. नव्या रस्त्यांच्या कंत्राटात रस्त्यासोबत डक्‍ट तयार करण्याच्या कामाचा समावेश केला आहे. या डक्‍टमुळे वाहिन्या थेट भूमिगत टाकल्याने वारंवार होणारे खोदकाम थांबणार आहे. विशेष म्हणजे या रस्त्याच्या कडेला तयार केलेले डक्‍ट एकमेकांना जोडलेले असल्याने काही दुरुस्ती करण्याची वेळ आली तर ठराविक अंतरावरचा डक्‍ट चेंबर उघडून दुरुस्ती करता येते. बेलापूर येथील सेक्‍टर १५ मध्ये असे डक्ट तयार केले आहेत.

Web Title: Reading on the ductus ring road work