esakal | "प्रेतं उचलायलाही तयार"; परिस्थितीपुढे हतबल मजुराने मांडली व्यथा

बोलून बातमी शोधा

Covid-Hearse-Van
"प्रेतं उचलायलाही तयार"; परिस्थितीपुढे हतबल मजुराने मांडली व्यथा
sakal_logo
By
जीवन तांबे

मुंबई: राज्यात सध्या कोरोनामुळे फारच विचित्र परिस्थिती आहे. राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने राज्यभर कडक लॉकडाउन लावण्यात आला आहे. लॉकडाउनमध्ये अनेक लोक बेरोजगार होण्याची भीती अनेकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बोलून दाखवली होती. त्यावर, 'लोकांना थोडी कळ सोसावी लागली तरी चालेल पण कोरोनाची साखळी तोडून लोकांचे प्राण वाचवणं जास्त महत्त्वाचं आहे', असं स्पष्ट मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं होतं. या लॉकडाउनमुळे काही लोकांचे रोजगार खरंच ठप्प झाल्याचं चित्र असून मजूरवर्ग परिस्थितीपुढे हतबल झाल्याचं दिसून येतंय. काहीही काम मिळालं नाही, तर अखेरचा पर्याय म्हणून प्रेतं उचलण्याचं कामदेखील करायला तयार असल्याची व्यथा एका मजूराने 'सकाळ'शी बोलताना मांडली.

हेही वाचा: शाकाहारी आणि धुम्रपान करणाऱ्यांना कोविडचा धोका कमी

img

अन्य राज्यांतून कुर्ला LTT स्थानकांवर येणाऱ्या प्रवाशांची सध्या फारशी गर्दी नाही. पण तरीदेखील अनेक लोक कामाच्या शोधार्थ एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्याचा पर्याय स्वीकारत आहेत. बाहेरून आलेल्या प्रवाशांची संख्या पाहता प्रतिबंध म्हणून राज्य सरकारने लॉकडॉउन लागू केला आहे. तसेच, आज कुर्ला LTT वर उतरलेल्या नागरिकांची अंटीजेन चाचणी करण्यात आली. या चाचणीनंतर मोलमजूरी करणारा एक मजूर रहीम याने 'सकाळ'शी संवाद साधला. "मुंबईत काम मिळत नसल्याने मी आधी गोव्याला मजुरीचे काम करत होतो. तिकडेही आता काम मिळत नसल्याने मी पुन्हा मुंबईला आलो. आता जे काम मिळेल ते काम करायला मी तयार आहे. कोरोनाला घाबरून जर मी आता घरात बसलो, तर माझ्या उपाशी मरण्याची वेळ येईल. त्यापेक्षा मी जे पडेल ते काहीही काम करायला तयार आहे. अगदी शेवटचा पर्याय म्हणून उपजिविकेसाठी प्रेतं उचलायला लागली तरीही चालेल", अशा शब्दांत रहीम याने आपलं दु:ख व्यक्त केलं.

हेही वाचा: शरद पवार यांच्या प्रकृतीबद्दल नवाब मलिक यांनी दिली महत्त्वाची माहिती

img

कुर्ला LTT वर बाहेरून आलेल्यांची होतेय अँटिजेन टेस्ट - मुंबईत कोरोनाची संख्या कमी करण्याकरता राज्य सरकार खबरदारी म्हणून मुंबईतील रेल्वे टर्मिनसवर येणाऱ्या प्रवाशांची अँटिजेन चाचणी करत आहे. लोकमान्य टिळक टर्मिनसवर आलेल्या तिरुअंनतपुरम ते LTT या गाडीतील प्रवाशांची पालिका कर्मचारी व खाजगी कर्मचारी यांच्या मार्फत अँटिजेन टेस्ट करण्यात आली. तसंच, त्या प्रवाश्यांच्या हातावर होम क्वारंटाइनचा शिक्का मारण्यात आला. यावेळी इतर नागरिकांनीही 'सकाळ'शी संवाद साधला. "मी कारपेंटर आहे. मुंबईला काम मिळत नसल्याने मडगावला कामानिमित्त गेलो होतो. पुढे कडक लॉकडॉउन होईल या भीतीने मुंबईला आलो. ही जी चाचणी केली जाते आहे ती योग्य आहे", असं अब्दुल नईम यांनी सांगितलं. तर "मी सीआरएफमध्ये कार्यरत आहे. कलीना येथील एअरपोर्ट मध्ये काम करतो. मी कामानिमित्त केरळला गेलो होतो. कामावर हजर होण्याकरिता आलो. मी टेस्ट करून घेतली आहे. टेस्ट करणे योग्य आहे. मी 14 दिवस होम क्वारंटाईन होणार आहे", असं एस. रेगी कुमार यांनी स्पष्ट केलं.

(संपादन- विराज भागवत)