esakal | शाकाहारी आणि धुम्रपान करणाऱ्यांना कोविडचा धोका कमी

बोलून बातमी शोधा

धुम्रपान
शाकाहारी आणि धुम्रपान करणाऱ्यांना कोविडचा धोका कमी
sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई: धुम्रपान करणारे तसेच शाकाहार करणाऱ्या व्यक्तींना कोविड- 19 चा संसर्ग तुलनेने कमी होत असल्याचे निरीक्षण केंद्र सरकारच्या कौन्सिल ऑफ सायंटीफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च म्हणजेच सीएसआयआरने मांडले आहे. नुकताच हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला असला तरी  निकोटीनचा कोरोना विषाणूवर होणाऱ्या परिणामावर अधिक सखोल अभ्यास करण्याची गरज असल्याचे ही नमूद करण्यात आले आहे.

हा अभ्यास अहवाल मांडण्यासाठी 140 डॉक्टर, संशोधक आणि  सीएसआयआरच्या 40 प्रयोगशाळामधील लोक सहभागी झाले होते. तर या अभ्यासात 10,427 लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले. संशोधनात  कोरोना विषाणूविरोधी लढण्यासाठी आवश्यक प्रतीपिंडे (अँटी बॉडीज), कोरोना विषाणू आणि कोणत्या व्यक्तीमध्ये त्यांचा प्रतिकार करण्याची अधिक क्षमता असते याचा अभ्यास केला.

काय सांगतो अभ्यास?

अभ्यासानुसार, धुम्रपान करणाऱ्याच्या शरीरात शेंबडाची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे विषाणूच्या प्रादुर्भावापासून प्राथमिक संरक्षण होत असावे असा अंदाज अहवालात मांडण्यात आला आहे. तर शाकाहारी व्यक्तींमध्ये फायबरचे प्रमाण मोठे असल्याने त्यातून दाह कमी करत आतड्यांना सशक्तपणा येत असल्याने त्याद्वारे कोविड-19 शी लढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रोग प्रतिकारकशक्ती प्राप्त होत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. तसेच, ओ रक्तगट असलेल्या व्यक्तींना

कोविड संक्रमणाचा कमी धोका असून ‘बी’ किंवा ‘एबी’ रक्तगट असलेल्यांमध्ये हा धोका अधिक असल्याचे सांगण्यात आले.याआधी इटली, न्यूयॉर्क आणि चीन येथे करण्यात आलेल्या दोन इतर सर्वेक्षणांमध्येसुद्धा धुम्रपानाबाबत असेच निष्कर्ष निघाले होते.

हेही वाचा: Virar Fire: ...तर त्या 15 जणांचा जीव वाचला असता!

अमेरिकेच्या ‘सेन्टर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन(सीडीसी)’ने कोविड- 19 झालेल्या 7000 लोकांचे सर्वेक्षण केले आणि त्यातूनही धुम्रपान करणाऱ्यांमध्ये संसर्ग कमी होतो, असाच निष्कर्ष निघाला.

अमेरिकेतील 14 टक्के लोकसंख्या धुम्रपान करत असूनही संसर्ग झालेल्यांमध्ये केवळ 1.3 टक्के लोकच धुम्रपान करणारे होते. तर, इंग्लंडमध्ये 14.4 टक्के लोक धुम्रपान करत असले तरी कोविड- 19 झालेल्यांमध्ये केवळ एक तृतीयांश लोकच धुम्रपान करणारे होते. असे ‘युनिव्हर्सीटी कॉलेज लंडन’च्या एका पाहणीत आढळून आले आहे. चीन, फ्रान्स या देशांच्या बाबतीत झालेल्या अभ्यासांमधूनसुद्धा असेच निष्कर्ष पुढे आले आहेत. तर चीनच्या ‘जीन-जीन झांगनुसार केवळ 9 किंवा 6.4 टक्के  लोकांमध्ये धूम्रपानाचा पूर्वेतिहास होता.

हेही वाचा: BMC कडे कोव्हिशिल्डचे इतके लाख डोस, मुंबईकरांना उद्या मिळेल लस

सखोल अभ्यासाची गरज :

केंद्र सरकारच्या कौन्सिल ऑफ सायंटीफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्चने मांडलेल्या पाहणी अहवालात महत्वाचा इशारा देण्यात आला आहे. मात्र धुम्रपान आणि त्यातून शरीरात जाणाऱ्या निकोटीनचा कोरोना विषाणूवर होणाऱ्या  परिणामाचा अधिक सखोल यांत्रिकीरित्या अभ्यास करण्याची गरज असल्याचे सूचित करण्यात आले आहे. धूम्रपानाने शरीरारावर घातकी  परिणाम होत असून अनेक रोगही उद्भवतात. त्यामुळे या पाहणीतील निष्कर्ष चुकीच्या पद्धतीने घेणे चुकीचे ठरेल. खासकरून तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे दुष्परिणाम सिद्ध झालेले असताना हे घातक ठरू शकते, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे. तर  शाकाहारामध्ये अधिक प्रमाणात फायबर असल्याने त्याचा फायदा रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी होत असल्याची दाट शक्यता असल्याचे नमूद केले गेले आहे.