खरंच... ठाण्यात 10 रुपयांत जेवण 

खरंच... ठाण्यात 10 रुपयांत जेवण 


ठाणे : विधानसभा निवडणुकीत 10 रुपयांत थाळी देण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर यावरून सोशलमीडियात बरेच विनोद चर्चिले गेले. मात्र, सरकार काही होईना आणि 10 रुपयात थाळीदेखील मिळेना. अशी अवस्था बनली असतानाच ठाण्यातील दोन तरुणांनी अवघ्या 10 रुपयांत जेवण उपक्रमाचा रविवारी शुभारंभ केला आहे. ठाण्यातील खारटन रोड परिसरात बाबाचा ढाबा येथे 10 रुपयांत भाजी व भात असे जेवण मिळत असून भुकेल्यांसह गोरगरिबांची याठिकाणी झुबंड उडत आहे.

दरम्यान, एकीकडे निवडणुकीत आश्‍वासन देणारे राजकीय पक्ष अद्यापही सत्तासंघर्षात दंग असताना ठाणेकर तरुणांनी ही योजना स्वतः सुरू करून राजकीय मंडळींना एकप्रकारे चपराक लगावली आहे. ठाणे पश्‍चिमेकडील खारटन रोड परिसरात राहणाऱ्या दिनेश मेहरोल आणि सुनील चेटोले यांनी गोरगरिबांची सेवा म्हणून ना नफा ना तोटा हा उपक्रम सुरू केला आहे. 10 रुपयांत भात आणि आमटी असे पौष्टिक आणि रुचकर जेवण देण्यास सुरुवात केल्याने कष्टकरी आणि कामगार वर्गासाठी एक पर्वणीच ठरली आहे.

रविवारी प्रारंभ करण्यात आलेल्या या योजनेचा पहिल्या दिवशी 250 जणांनी लाभ घेतला; तर सोमवारी तब्बल 325 जण जेवले. दरम्यान, एकीकडे राजकीय पक्षांकडून 10 रुपयांच्या जेवणाच्या थाळीची घोषणा होत असताना आश्‍वासन देणाऱ्या सरकारचाच अजून पत्ता नाही. मात्र, दुसरीकडे 10 रुपयांत जेवण देण्याचा मान ठाण्याच्या या तरुणांनी मिळवला आहे. त्यामुळे अनेकांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून आश्‍वासन देणाऱ्या पक्षाने लवकरात लवकर सरकार स्थापन करून 10 रुपयांत जेवण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीदेखील अनेकांनी या निमित्ताने केली आहे. 


वास्तविक आर्थिकदृष्ट्या अशी योजना शक्‍य नसली तरी कोणतेही राजकीय श्रेय किंवा फायद्यासाठी ही योजना राबविण्यात आलेली नाही. निवडणुकीत राजकीय पक्षांनी दिलेले आश्‍वासन 10 रुपयांत संपूर्ण थाळीचे आहे; तर आमचे 10 रुपयात जेवण म्हणजेच भात व आमटी हे दोनच जिन्नस देत आहोत. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून 10 रुपयांत थाळी देण्याचे नियोजन केले होते. भुकेल्यांना भोजन देऊन एकप्रकराची सेवा आम्ही करीत आहोत. कोणत्याही राजकीय पक्षाची आम्हाला साथ लाभली नसून नागरिकांचा उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. 
दिनेश मेहरोल, योजनेचे संयोजक 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com