कर्नाटकच्या आमदारांमध्ये भिती; पोलिस संरक्षणाची मागणी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जुलै 2019

'आम्ही पवईतील रेनायसंस हॉटेलमध्ये राहत असून या हॉटेलमध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे धाड मारणार असल्याचे आम्ही ऐकले आहे. यामुळे आम्ही घाबरलो असून त्यांना या हॉटेलमध्ये येण्यास मज्जाव करावे' अशी मागणी या आमदारांनी केली आहे. या पत्रावर या दहा आमदारांच्या सह्या आहेत.

मुंबई : कर्नाटकातील काँग्रेस आणि जेडीएसच्या 10 बंडखोर आमदारांनी मुंबईचे पोलिस आयुक्त संजय बर्वे यांना पत्र लिहून संरक्षणाची मागणी केली आहे. 'आम्ही पवईतील रेनायसंस हॉटेलमध्ये राहत असून या हॉटेलमध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे धाड मारणार असल्याचे आम्ही ऐकले आहे. यामुळे आम्ही घाबरलो असून त्यांना या हॉटेलमध्ये येण्यास मज्जाव करावे' अशी मागणी या आमदारांनी केली आहे. या पत्रावर या दहा आमदारांच्या सह्या आहेत.

कर्नाटकात राजीनामा नाट्य रंगले असून सरकारमधील 12 आमदारांनी राजीनामा दिला आहे. यात काँग्रेसच्या 9 तर जेसीएस 3 आमदारांचा समावेश आहे. राजीनामा दिल्यानंतर यातील 10 आमदार हे मुंबईत वास्तव्यास आहेत. या आमदारांना भेटण्याचा काँग्रेस आणि जेडीएस कडून प्रयत्न केला जातोय मात्र हे आमदार कुणालाही भेटण्यास तयार नाहीत.

राजीनामा दिलेले अनेक आमदार हे भाजपच्या संपर्कात असल्याचं बोललं जातंय. जर हे राजीनामे मंजूर झाले तर कुमारस्वामी सरकार कोसळेल. यामुळे या आमदारांचं मन वळवण्याचे प्रयत्न मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे करत आहेत. हे दोघे या 10 आमदारांना भेटण्यासाठी या हॉटेलमध्ये येणार असल्याची माहिती मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर या आमदारांनी पोलिस आयुक्तांना पत्र लिहून ही मागणी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rebellious MLA s ask for Police protection