आईमुळे मुलाला पुनर्जन्म 

दीपक शेलार - सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 8 मार्च 2017

मुलाच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे कळले. वाईट वाटले; पण मी खचले नाही. कुटुंबाला धीर देत प्रसंगाला तोंड देण्यासाठी तयारी सुरू केली. कारण मुलाच्या आनंदातच माझा आनंद आहे. मुलांच्या भावी आयुष्यासाठी प्रसंगी मी माझ्या दोन्ही किडन्या दान केल्या असत्या. 
- भीमाबाई धनाजी गोरपेकर. 

ठाणे - वेदनेनंतरची पहिली आरोळी म्हणजे "आई'. प्रत्येक आई आपल्या मुलाबाळांसाठीच जगत असते. त्यांचे आयुष्य उजळवण्यासाठी स्वत: अंधाराचा सामना करत असते. अशाच प्रकारे इथल्या एका आईने मुलाला किडनी दान करून पुनर्जन्म दिला. 

शिळ डायघरजवळील नारिवली गावातील भीमाबाई धनाजी गोरपेकर (46) यांनी आपली एक किडनी दिल्याने मुलगा प्रवीण ( 24) याला नवजीवन मिळाले आहे. नवी मुंबई पालिकेत कंत्राटी सफाई कामगार असलेल्या प्रवीणचा विवाह झाला. त्यानंतर सात महिन्यांत बाहेरच्या खाण्यामुळे वजन वाढून त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे निदान डॉक्‍टरांनी केले. दोन्ही किडन्याच काम करत नसल्याने शस्त्रक्रिया न केल्यास मृत्यू अटळ होता. हे कळताच गोरपेकर कुटुंबावर आभाळ कोसळले. नववधू तर मुळापासून हादरली. मात्र दोन महिने डायलिसिसवर काढल्यानंतर भीमाबाई यांनी आपल्या मुलासाठी एक किडनी देण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यानुसार 24 डिसेंबर 2016 ला जसलोक रुग्णालयात यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले. 

प्रवीणचे वडील ठाणे पालिकेत सफाई खात्यात मुकादम आहेत. त्यामुळे त्यांची मिळकत तशी मर्यादित आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्याने प्रवीणच्या उपचाराचा जमेल तेवढा खर्च उचलला. या शस्त्रक्रियेसाठी 10 ते 12 लाखांचा खर्च आला. प्रत्यारोपणानंतर सर्वसामान्यांसारखे आयुष्य जगत असून आईमुळेच पुनर्जन्म लाभल्याचे तो सांगतो. 

मुलाच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे कळले. वाईट वाटले; पण मी खचले नाही. कुटुंबाला धीर देत प्रसंगाला तोंड देण्यासाठी तयारी सुरू केली. कारण मुलाच्या आनंदातच माझा आनंद आहे. मुलांच्या भावी आयुष्यासाठी प्रसंगी मी माझ्या दोन्ही किडन्या दान केल्या असत्या. 
- भीमाबाई धनाजी गोरपेकर. 

Web Title: rebirth child