esakal | मंदीत दलालांनी साधली संधी, स्थलांतरितांकडून बक्कळ वसुली!
sakal

बोलून बातमी शोधा

migrants at Thane

लॉकडाऊनमुळे अनेकांच्या व्यवसाय व रोजगारावर गदा आली असली तरी, येनकेनप्रकारे दलाली करणाऱ्यांची मात्र चांगलीच चांदी होत आहे. सध्या मुंबई-ठाण्यातून परराज्यात मूळगावी निघालेल्या श्रमिकांना पोलिसांकडून ई-पास मिळवून देण्यासह वाहनाची व्यवस्था करणाऱ्या दलालांचा सुळसुळाट वाढला आहे. श्रमिकांच्या हतबलतेचा लाभ उठवत काही जण अवाच्या सव्वा रक्कम उकळत असल्याचे समोर आहे. त्यामुळे प्रशासनाने याविरोधात उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

मंदीत दलालांनी साधली संधी, स्थलांतरितांकडून बक्कळ वसुली!

sakal_logo
By
दीपक शेलार

ठाणे : लॉकडाऊनमुळे अनेकांच्या व्यवसाय व रोजगारावर गदा आली असली तरी, येनकेनप्रकारे दलाली करणाऱ्यांची मात्र चांगलीच चांदी होत आहे. सध्या मुंबई-ठाण्यातून परराज्यात मूळगावी निघालेल्या श्रमिकांना पोलिसांकडून ई-पास मिळवून देण्यासह वाहनाची व्यवस्था करणाऱ्या दलालांचा सुळसुळाट वाढला आहे. श्रमिकांच्या हतबलतेचा लाभ उठवत काही जण अवाच्या सव्वा रक्कम उकळत असल्याचे समोर आहे. त्यामुळे प्रशासनाने याविरोधात उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

क्लिक करा : ठाणे जिल्ह्यातील 232 जणांची 'वन्दे भारत मिशन'अंतर्गत घरवापसी

कोरोनाचे प्रस्थ दिवसेंदिवस वाढत असल्याने तसेच, तब्बल दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे उद्योग-व्यवसाय ठप्प झाले आहेत. मुंबई-ठाण्यात कामानिमित्त असलेल्या परराज्यातील श्रमिक व व्यावसायिकांचा रोजगार यात बुडाला आहे. छोटी-मोठी कामे तसेच, मोलमजुरी करणाऱ्यांच्या हाताला कामधंदा नसल्याने या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.

त्यामुळे, पायपीट करीत अथवा मिळेल त्या वाहनाने ही मंडळी आपापल्या गावी निघाली. आता तर पोलिसांकडून ई-पास काढून गावी जाण्याची अनुमती मिळत असल्याने अनेकांनी वैद्यकीय प्रमाणपत्रासह ऑनलाईन-ऑफलाईन अर्ज संबंधित पोलिस ठाण्यांकडे केले आहे.

क्लिक करा : उकाड्यात सरली रात्र, दिवसाही त्याच वेदना! 

मात्र, बंदोबस्त-नाकाबंदीच्या व्यापात आणि रेल्वे प्रशासनाकडील अपुऱ्या प्रवास सुविधेअभावी अनेकांना अद्याप ई-पासदेखील मिळालेले नाहीत. अशा अडलेल्या नडलेल्या श्रमिकांना हेरून काही दलाल मंडळी ई-पाससह वाहनाची व्यवस्था करून देण्यासाठी बक्कळ रक्कम उकळत आहेत. शिवाय, सध्या परराज्यात निघालेल्यांची पोलिसांकडूनदेखील कुठेही अडवणूक होत नसल्याने, अनेकजण टेम्पो अथवा मिळेल त्या वाहनाने प्रतिव्यक्ती 2 ते 5 हजार रुपये देऊन गावची वाट धरीत असल्याने दलालांचे फावत आहे. 

एसटीची मोफत सेवा, संयम बाळगा
लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या श्रमिकांसाठी प्रशासनाने ठिकठिकाणाहून मोफत एसटी बस सोडल्या आहेत. ठाणे आगारासह रत्नागिरी आणि नाशिक आगारातील अतिरिक्त बस देखील ठाण्यातून रवाना केल्या जात आहेत. तेव्हा, परराज्यात जाणाऱ्या नागरिकांनी दलालांच्या आमिषाला बळी न पडता थोडा संयम बाळगून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन ठाणे पोलिस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.

राजस्थानसाठी प्रशासनाने पुरेशी व्यवस्था केलेली नाही, किंबहुना ई-पास मिळवताना दमछाक होत आहे. मुंबईतील व्यक्तीने आमच्या 22 जणांच्या समुहाला ई-पाससह प्रतिव्यक्ती 5 हजार घेऊन ठाण्याहुन थेट उदयपूरला जाणारी बस उपलब्ध करून दिली. भलेही पैसे गेले तरी, आमची गावी जाण्याची व्यवस्था झाल्याचे समाधान आहे.
- रुपेश पटेल
स्थलांतरित, राजस्थान