ठाणे जिल्ह्यातील 232 जणांची 'वन्दे भारत मिशन'अंतर्गत घरवापसी

राहुल क्षीरसागर
Saturday, 16 May 2020

कोरोनाच्या काळात परदेशात अडकलेल्या नागरिकांना 'वन्दे भारत मिशन'अंतर्गत स्वगृही आणण्यात येत आहे. त्यानुसार मागील चार दिवसात लंडन, सिंगापूर, शिकागो आदी ठिकाणी अडकलेले ठाणे जिल्ह्यातील 232 जण स्वगृही परतले आहेत.

ठाणे : कोरोनाच्या काळात परदेशात अडकलेल्या नागरिकांना 'वन्दे भारत मिशन'अंतर्गत स्वगृही आणण्यात येत आहे. त्यानुसार मागील चार दिवसात लंडन, सिंगापूर, शिकागो आदी ठिकाणी अडकलेले ठाणे जिल्ह्यातील 232 जण स्वगृही परतले आहेत.

क्लिक करा : पालकमंत्री को गुस्सा क्यो आता है...

परदेशातून आलेल्या नागरिकांना थेट त्यांच्या घरी न पाठवता त्यांना विलगीकरण कक्षात राहणे बंधनकारक आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने शहरातील खासगी हॉटेल आरक्षित केले असून या ठिकाणी त्यांच्या राहण्यासह जेवण, न्याहारीचा खर्च मात्र या नागरिकांनाच करावा लागणार आहे. नागरिकांची हॉटेलमध्ये पैसे खर्च करून राहण्याची परिस्थिती नाही, त्यांच्यासाठी पालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या विलगीकरण कक्षात व्यवस्था करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. 

केंद्र सरकारच्या आदेशानुसार राज्य सरकारने परदेशातून येणाऱ्या नागरिकांची व्यवस्था ते वास्तव्यास असणाऱ्या जिल्ह्याच्या मुख्य शहरातील हॉटेलमध्ये करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने परदेशातून आलेल्या नागरिकांच्या विलगीकरणाची व्यवस्था ठाणे, नवी मुंबई आणि भिवंडी या तीन शहरांतील हॉटेलमध्ये केली आहे.

त्यात ठाणे जिल्ह्यात 10 मेपासून 13 मेपर्यंत नऊ विशेष विमानाने लंडन, शिकागो, ढाका, सिंगापूर आदी ठिकाणाहून 232 नागरिक मायदेशी परतले. हे नागरिक विमानतळावर दाखल होताच जिल्हा प्रशासनामार्फत त्यांच्यापुढे हॉटेलमधील खोल्यांच्या दर्जानुसार त्यांचे दरपत्रक ठेवण्यात येते. तसेच नागरिकांना ज्या हॉटेलचे दर परवडतील, अशाच हॉटेल्समध्ये त्यांची व्यवस्था करण्यात येते. 

क्लिक करा : उकाड्यात सरली रात्र, दिवसाची त्याच वेदना!

ज्या नागरिकांना हॉटेलचे भाडे परवडत नाही, अशा नागरिकांसाठी महापालिकेच्या विलगीकरण कक्षात व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती ठाणे प्रांत अधिकारी अविनाश शिंदे यांनी दिली. त्यानुसार ठाणे शहरातील विविध हॉटेलमध्ये 197 नागरिक राहत असून नवी मुंबई येथे 14 तर, भिवंडी येथील हॉटेल्समध्ये 24 परदेशातून आलेले नागरिक राहत आहेत. तर, 13 नागरिकांना हॉटेलमध्ये राहणे परवडणारे नसल्यामुळे त्यांना महापालिकेच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. यामध्ये ठाणे पालिकेच्या कासारवडवली येथील विलगीकरण केंद्रात 12 तर, मीर-भाईंदर येथे एका नागरिकाला ठेवण्यात आले आहे,

दरम्यान, परदेशातून आलेल्या नागरिकांमध्ये लगेचच लक्षणे आढळून येत नाहीत. सात दिवसानंतर त्यांच्यात कोरोनाची लक्षणे जाणवू लागतात. त्यामुळे या नागरिकांची सात दिवसांनंतर संबंधित महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने कोरोना संदर्भातील तपासणी करण्यात येणार असून त्यात त्यांच्या अहवाल नकारात्मक आल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात येणार आहे. 

परदेशातून परतलेल्या जिल्ह्यातील नागरिकांची हॉटेलमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक हॉटेलच्या दर्जानुसार दर ठरविण्यात आले असून दोन हजारापासून ते पाच हजारापर्यंत हे दर आहेत. प्रत्येक नागरिकाने त्यांच्या मर्जीनुसार हॉटेलची निवड करावी. तसेक खर्च कमी करण्यासाठी एका खोलीत दोघेजण राहण्याचीही मुभा देण्यात आली आहे. परदेशातून येणाऱ्या नागरिकांसाठी स्वस्त हॉटेल सज्ज ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करत आहे.
- अविनाश शिंदे, 
प्रांत अधिकारी, ठाणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 232 people from Thane district returned under 'Vande Bharat Mission'