लाल गालिचा... तरी निरुत्साह!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

मतदानाचा टक्का वाढावा याकरिता निवडणूक आयोगाने आज नवी मुंबईतील  अगदी मतदारांना चालण्यासाठी पायाखाली रेडकारपेट अंथरला होता. त्यानंतर केंद्रात प्रवेश करताच हातात थेट तुळशीची रोपे देऊन ‘सोने पे सुहागा’ अशा भावना निर्माण होत होत्या. आयोगाच्या एवढ्या पायघड्यांनंतरही नवी मुंबईत मतदारांनी निरूत्साह दाखवला.

नवी मुंबई : मतदानाचा टक्का वाढावा याकरिता निवडणूक आयोगाने आज नवी मुंबईतील  अगदी मतदारांना चालण्यासाठी पायाखाली रेडकारपेट अंथरला होता. त्यावरून चालत मतदान केंद्रात पोहोचणाऱ्या मतदारांची ओवाळणी करून नंतर मतदान करण्यासाठी पाठवले जात होते. या सर्व आदरातिथ्यामुळे आधीच भारावून गेलेला मतदारराजा मतदान करून आल्यानंतर त्याच्या हातात थेट तुळशीची रोपे देऊन ‘सोने पे सुहागा’ अशा भावना निर्माण होत होत्या. आयोगाच्या एवढ्या पायघड्यांनंतरही नवी मुंबईत मतदारांनी निरूत्साह दाखवला.

मतदारांमध्ये महिलांची संख्या पुरुषांच्या संख्येपेक्षा तुलनेत सारखीच असूनही महिला मतदारांचे मतदान कमी होत असते; त्यामुळे नेरूळमधील मतदान केंद्राचे सखी मतदान केंद्र असे नामकरण करण्यात आले होते. नेरूळ सेक्‍टर १८, विद्याभवन हायस्कूलमध्ये मतदान केंद्रात निवडणूक आयोगातर्फे तुळशीचे रोप देऊन आणि ज्येष्ठ महिलांचे औक्षण करून मतदानाला सुरुवात केली. ऐरोलीतील सरस्वती विद्यामंदिर शाळेत आयोगातर्फे फुग्यांची सजावट करण्यात आली होती. तसेच अपंगांच्या चिन्हाची रांगोळी तयार करून अपंग मतदारांचे स्वागत करण्यात आले. या मतदान केंद्रात येणाऱ्या प्रत्येक मतदाराचे मतदान अधिकाऱ्यांकडून विनम्रतेने स्वागत करून आदरातिथ्य केले जात होते. मतदान केंद्रात मिळणाऱ्या या अनपेक्षित वागणुकीमुळे मतदार हरखून गेले होते. ऐरोली व बेलापूर मतदारसंघात निवडणूक आयोगाने मतदार राजांसाठी एवढ्या पायघड्या घातल्यानंतरही मतदारांनी मतदानात निरुत्साह दाखवला. सकाळी मतदानाला मिळत असलेला संमिश्र प्रतिसाद दुपारनंतर मावळला. दुपारी अनेक मतदान केंद्रांवरील गर्दी आटली होती; परंतु संध्याकाळी काही मतदान केंद्रांवर तुरळक गर्दी झाली होती. 

केंद्रावर सजावटीसह सेल्फी पॉईंट
महिला बचत गटांच्या महिला, महापालिकेच्या समूह संघटिका यांच्या माध्यमातून रांगोळ्यांचे सडे, आकर्षक कुंड्या, बॅनर, हारफुलांच्या माळांनी मतदान केंद्र सजावट केली होती. पारंपरिक वेशभूषा व डोक्‍यावर फेटे बांधून निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी मतदारांचे स्वागत केले. तसेच मतदारांना आकर्षित करण्यासाठी केंद्रांवर सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The red carpet ... however apathetic!