पावसामुळे लाल मिरचीचा भडका!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

अवकाळी पावसामुळे लाल मिरचीच्या उत्पादनात मोठी घट झाल्याने, बाजार मागणीइतका पुरवठा करण्यासाठी शेतकऱ्यांकडे माल उपलब्ध नाही. त्यामुळे बाजारात लाल मिरचीचा तुटवडा निर्माण झाला असून, परिमाणस्वरूप दरात मोठी वाढ झाली आहे. 

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मसाला बाजारात नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुक्‍या लाल मिरचीची आवक वाढण्यास सुरुवात होते. नेहमी दोन ते तीन गाड्या होणारी मिरचीची आवक ही या कालावधीत १० ते १२ गाड्यांपर्यंत जाते; मात्र या वर्षी नोव्हेंबर महिना सुरू होऊनही मसाल्यासाठीच्या या लाल मिरचीची आवक वाढलेली नाही. अवकाळी पावसामुळे उत्पादनात मोठी घट झाल्याने, बाजार मागणीइतका पुरवठा करण्यासाठी शेतकऱ्यांकडे माल उपलब्ध नाही. त्यामुळे बाजारात लाल मिरचीचा तुटवडा निर्माण झाला असून, परिमाणस्वरूप दरात मोठी वाढ झाली आहे. 

पावसाळा संपल्यानंतर नोव्हेंबर महिन्यापासून मसाला बाजारात सुकलेल्या लाल मिरच्यांची आवक सुरू होते. त्याचबरोबर वर्षभर पुरेल इतका लाल मसाला बनवण्यासाठी गृहिणींची लगबगही सुरू होते. बाजारात प्रामुख्याने महाराष्ट्राशिवाय कर्नाटक, आंध्र प्रदेशामधून मोठ्या प्रमाणात आवक होते. यामध्ये लवंगी, पांडी, बेडगी आणि काश्‍मिरी मिरचीचा समावेश असतो. ऑक्‍टोबरअखेरपर्यंत दोन-तीन गाड्यांची आवक बाजारात सुरू असते; मात्र नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून हळूहळू आवक वाढण्यास सुरुवात होते. या कालावधीत दररोज किमान १० ते १२ गाड्या बाजारात दाखल होतात. त्यानंतर हळूहळू ही आवक २० ते २५ गाड्या आणि एप्रिल, मे महिन्यापर्यंत ५० ते ६० गाड्यांपर्यंत पोहोचते. या वर्षी मात्र नोव्हेंबर महिना अर्धा संपत आला, तरी मिरचीची आवक वाढण्यास सुरुवात झालेली नाही. सद्यस्थितीत केवळ दोन ते तीन गाड्या लाल मिरची बाजारात दाखल होत आहे. कोल्हापूर, कर्नाटक या प्रमुख उत्पादन क्षेत्रात पावसाने थैमान घातल्याने, मिरचीच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यातच सद्यस्थितीत जी मिरची उत्पादित होत आहे. ती पिकवून सुकवण्यास योग्य वातावरण नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यामुळे बाजारात सुकलेल्या लाल मिरचीचा तुटवडा निर्माण झाला आहे. 

अल्प प्रमाणात आवक होत असल्याने सुक्‍या मिरचीच्या दरात वाढ झाली आहे. घाऊक बाजारात सध्या प्रतिकिलो ५० ते ६० रुपयांची वाढ झाली आहे. अवकाळी पावसामुळे मिरचीचे पीक एक ते दीड महिना लांबणीवर गेले. त्यानंतर आवक वाढण्याची शक्‍यता असून हळूहळू कमी होतील.
- कौस्तुभ शहा, व्यापारी.

दृष्टीक्षेप 
मिरची    मागील वर्षी    या वर्षी (रुपये प्रतिकिलो) 
लवंगी मिरची    १३० ते १४०    १५० ते १९०
बेडगी    १४० ते १५०    १५० ते २००
पांडी    ११० ते १२०    १३० ते १७०  
काश्‍मिरी    १७० ते १८०    १८० ते २२०


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Red pepper pricey due to rain!