मुंबईत रेडीरेकनर दरात कपात; व्यावसायिकांची संमिश्र प्रतिक्रिया

समीर सुर्वे
Saturday, 12 September 2020

नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने राज्यात सरासरी 1.74 टक्के तर ग्रामिण भागात 2.81 टक्क्यांनी  रेडीरेकनरच्या दरात वाढ केली आहे.

मुंबई :  नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने राज्यात सरासरी 1.74 टक्के तर ग्रामिण भागात 2.81 टक्क्यांनी  रेडीरेकनरच्या दरात वाढ केली आहे. मात्र, प्रथमच मुंबईत सध्याच्या रेडी रेकनर दरात 0.6 टक्क्यांनी कपात केली आहे. या निर्णयाबद्दल बांधकाम व्यावसायिकांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. मुंबईत दर कमी केल्याने घरखरेदीदार आणि बांधकाम व्यावसायिक दोघांनाही दिलासा मिळेल. मात्र, उर्वरित राज्यात बांधकाम प्रकल्पांवर परिणाम होईल, असे व्यावसायिकांनी म्हटले आहे. 

मुख्यमंत्र्यांचे व्यंगचित्र फॉरवर्ड केले म्हणून माजी नौदल अधिकाऱ्यांना शिवसैनिकांची बेदम मारहाण; कठोर कारवाईची भाजपची मागणी

यापुर्वी राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात कपात करुन घरखरेदी क्षेत्राला चालना देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हा दुसरा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे मुंबईत घर खरेदीसाठी सकारात्मक वातावरण निर्माण होईल, असे जाणकारांचे मत आहे. सरकारने रेडीरेकनरच्या दरात सुसूत्रता आणली आहे. जेथे दर बाजारभावांच्या तुलनेत जास्त होते, तेथे ते कमी केले आहेत. जेथे दर कमी होते, तेथे वाढवले आहेत. हा चांगला निर्णय असून त्यामुळे आता कोणावरही अन्याय होणार नाही व सर्वत्र समानता येईल, असे मत नरेडकोचे महाराष्ट्र अध्यक्ष आणि रौनक समूहाचे व्यवस्थापकीय संचालक राजन बांदेलकर यांनी व्यक्त केले.  

मुंबईत पुन्हा कोरोनाचा हाहाकार; रुग्णदरात पुन्हा मोठी वाढ; 7 हजारापेक्षा जास्त इमारती सील

सध्याच्या आर्थिक टंचाईच्या काळात अशाच निर्णयांची गरज होती. मुंबईतील रेडी रेकनरचे दर कमी झाले असले तरी उर्वरित महाराष्ट्रातही हे दर कमी करायला हवे होते, अशी प्रतिक्रिया असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडियाचे अध्यक्ष निरंजन हिरानंदानी व अन्य व्यावसायिकांनी व्यक्त केले. उर्वरित राज्यात रेडीरेकनरचे दर वाढवणे चुकीचे आहे. सर्वत्र दर कमी करण्याची शिफारस आम्ही नरेडको मार्फत केली होती. निदान जेथे घरांचे मूल्य कमी आहे तेथे रेडीरेकनर चे दर कमी असावेत, असे आम्ही सुचवले होते, असे हिरानंदनी म्हणाले. तसेच, पंतप्रधानांपासून सर्वच जण घरांच्या किमती कमी करा असे सांगतात.  पण, सरकारने त्यानुसार पावले उचलली नाहीत  तर, आम्ही घरांच्या किमती कशा कमी करणार, असा सवाल त्यांनी केला. 

 

मुंबईत रेडी रेकनरचे दर कमी करणे हे स्वागतार्ह पाऊल आहे, त्याने घरखरेदीदार व बांधकाम व्यावसायिक या दोघांनाही दिलासा मिळेल. आजच्या आर्थिक टंचाईच्या काळात अशाच निर्णयांची गरज होती. 
- जतीन देसाई,
साई डेव्हलपर

 

मुंबईतील रेडी रेकनरचे दर कमी होणे, ही चांगली बाब आहे. मुद्रांकशुल्क कपातीनंतर सरकारने हा दुसरा दिलासा बांधकाम क्षेत्राला दिला आहे.  खरे पाहता सर्वत्र बाजाराभावाएवढेच रेडी रेकनर दर असावे, अशी आमची अपेक्षा होती. मात्र उर्वरित महाराष्ट्रात हे दर वाढवणे हे आम्हाला अपेक्षित नव्हते 
- मंजू याज्ञिक,
उपाध्यक्षा, नाहर ग्रूप 

 

रेडी रेकनरच्या दरात राज्यात सर्वत्र कपात होईल, अशी बांधकाम क्षेत्रात सर्वांनाच अपेक्षा होती. पण, उलट राज्य सरकारने त्यात वाढ केल्याने त्याचा परिणाम किंमतवाढीत होईल. त्याचप्रमाणे बाजारभावापेक्षा रेडीरेकनरचे भाव जास्त आहेत तेथे आयकर आकारणीमुळे मालमत्तांचे व्यवहार कमी होतील. या निर्णयामुळे नव्या प्रकल्पांवर वाईट परिणाम होईल व सध्या सुरु असलेल्या प्रकल्पांची व्यवहार्यताही कमी होईल. 
- दीपक गोराडिया,
अध्यक्ष, एमसीएचआय क्रेडाई

------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Redireckoner rates cut in Mumbai