म्हणून पालीत शुकशुकाट 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 मार्च 2020

संकष्ट चतुर्थीच्या मुहूर्तावर बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जनजागृती करणारे माहिती फलक लावले होते. सॅनिटायझर उपलब्ध करून दक्षता घेतली होती. पण भाविकांची तुरळक वर्दळ होती. मंदिर परिसरातील बाजारपेठ, हॉटेल आणि दुकानांत शुकशुकाट होता. 

पाली : संकष्ट चतुर्थीला अष्टविनायक देवस्थानांपैकी एक असलेल्या बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी पालीत नेहमीच भाविकांची अलोट गर्दी असते. ती आवरताना देवस्थान प्रशासनाच्या नाकीनऊ येतात; पण कोरोनाच्या भीतीमुळे आजची संकष्ट चतुर्थी त्याला अपवाद ठरली. शहरात भाविकांची तुरळक वर्दळ पाहिल्यानंतर व्यावसायिकांनीही आश्‍चर्य व्यक्त केले. 

कोरोनाच्या भीतीमुळे प्रवास मंदावला

संकष्ट चतुर्थीच्या मुहूर्तावर बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जनजागृती करणारे माहिती फलक लावले होते. सॅनिटायझर उपलब्ध करून दक्षता घेतली होती. पण भाविकांची तुरळक वर्दळ होती. मंदिर परिसरातील बाजारपेठ, हॉटेल आणि दुकानांत शुकशुकाट होता. 

देशात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. आजार संसर्गजन्य असून त्याचा फैलाव जलदगतीने होत आहे. त्यामुळे सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी जाण्यास अनेक जण टाळत आहेत. त्याचबरोबर तिथीनुसार शिवजयंतीचे गावोगावी कार्यक्रम आणि दहावी आणि बारावीच्या परीक्षादेखील असल्याने मंदिर परिसरात भाविकांची गर्दी कमी असल्याचे देवस्थानचे अध्यक्ष ऍड. धंनजय धारप यांनी "सकाळ'ला सांगितले.

प्रियांका चतुर्वेदींना लॉटरी

सार्वजनिक कार्यक्रम नको 
कोरोना विषाणूंचा प्रसार कमी होईपर्यंत जिल्ह्यात सभा, मेळावे, सामाजिक कार्यक्रम करू नयेत, असे आवाहन रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी नागरिकांना, स्थानिक स्वराज्य संस्थांना केले आहे. 

रायगड जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही. या आजाराच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी पुरेपूर दक्षता घेतली जात आहे. 
- डॉ. प्रमोद गवई, जिल्हा शल्यचिकित्सक 

पाली : कोरोनाच्या भीतीने बल्लाळेश्वर मंदिरात संकष्ट चतुर्थीला भाविकांची संख्या खूपच कमी होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reduced number of Pali devotees