
मुंबईला बसलेला कोव्हिडचा फास आता सैल होऊ लागला आहे. गेल्या 16 दिवसांत तब्बल तीन लाखांहून अधिक नागरिकांची कोव्हिड प्रतिबंधित क्षेत्रातून सुटका झाली आहे
मुंबई : मुंबईला बसलेला कोव्हिडचा फास आता सैल होऊ लागला आहे. गेल्या 16 दिवसांत तब्बल तीन लाखांहून अधिक नागरिकांची कोव्हिड प्रतिबंधित क्षेत्रातून सुटका झाली आहे; तर लालबाग, परळ विभागात कोव्हिडचे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 224 दिवसांवर पोहचला आहे. एप्रिलपासून पहिल्यांदाच एखाद्या विभागातील कोव्हिडचा दर पहिल्यांदा एवढा खाली आला आहे.
हेही वाचा - मराठा आरक्षणासंदर्भात मंगळवारी होणारी सुनावणी मान्य नाही : अशोक चव्हाण
मुंबईत कोव्हिडचे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 126 दिवसांवर आला आहे, तर एफ दक्षिण प्रभाग लालबाग, परळ परिसरात कोव्हिडचे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 224 दिवसांवर पोहचला आहे. पहिल्यांदाच एखाद्या विभागातील रुग्ण दुपटीचा कालावधी 200 दिवसांच्या पुढे गेला आहे. मुंबईतील सर्वच प्रभागांतील कोव्हिडचा संसर्ग नियंत्रणात येऊ लागला आहे. कोणत्याही विभागात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 85 दिवसांच्या खाली नाही.
कोव्हिडचा संसर्ग नियंत्रणात येत असताना प्रतिबंधित वस्त्या आणि सील इमारतींची संख्याही कमी होऊ लागली आहे. मुंबईत 24 ऑक्टोबरला कोव्हिडचे रुग्ण आढळल्याने 8 हजार 503 इमारती सील होत्या. या इमारतीत 8 लाख 90 हजार रहिवासी आहेत, तर 8 ऑक्टोबरला 10 हजार 99 इमारती सील होत्या. त्या इमारतींमध्ये 31 लाख 10 हजार रहिवासी होते. फक्त इमारतींमधीलच कोव्हिडचा संसर्ग कमी झालेला नाही तर वस्त्या आणि चाळींमध्येही नियंत्रणात येत आहे. 8 ऑक्टोबरला प्रतिबंधित असलेल्या 643 वस्त्यांमध्ये 31 लाख 10 हजार नागरिक राहत होते, तर 24 ऑक्टोबरला 632 वस्त्या प्रतिबंधित असून, त्यात 29 लाख 40 हजार नागरिक राहत आहेत.
हेही वाचा - नायरमधील 125 स्वयंसेवकांना कोव्हिशिल्ड लसीचा पहिला डोस; चार महिने पाठपुरावा
सर्वाधिक सील इमारती असलेले प्रभाग
बोरिवली- 1316
कांदिवली- 719
मालाड- 687
सर्वाधिक प्रतिबंधित वस्त्या असलेले विभाग
दहिसर- 69
अंधेरी, जोगेश्वरी पूर्व- 64
विक्रोळी, भांडुप- 57
----------------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )